नवी दिल्ली - देशात अनेक धक्कादायक घटना सातत्याने समोर येत आहेत. अशीच एक हैराण करणारी घटना घडली आहे. अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून 9 महिन्यांपासून एक महिला कॉन्स्टेबल बेपत्ता झाली होती. मात्र आता अचानक ती फुलांची विक्री करताना सापडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रायपूर पोलीस दलात कार्यरत असलेल्या महिला कॉन्स्टेबल अंजना सहिस गेल्या नऊ महिन्यांपासून बेपत्ता होत्या. आपले कुटुंबीय आणि वरिष्ठ अधिकारी यांच्या त्रासाला कंटाळून त्या अचानक गायब झाल्या होत्या. मात्र आता उत्तर प्रदेशच्या वृंदावनमध्ये फुलांची विक्री करताना दिसून आल्या आहेत.
महिला कॉन्स्टेबल अंजना सहिस वृंदावनमध्ये फुल विकत असल्याची माहिती मिळताच छत्तीसगड पोलिसांची एक टीम त्यांना घेण्यासाठी आली. मात्र अंजना यांनी त्यांच्यासोबत जाण्यास स्पष्ट नकार दिला आहे. गेले अनेक महिने पोलीस अंजना यांचा शोध घेत होते. मात्र त्या सापडतच नव्हत्या. त्यांच्या आईने आपली मुलगी बेपत्ता असल्याची पोलिसांत तक्रार केली होती. त्यानंतर शोध सुरू होता. पण अंजना यांनी मोबाईलचा वापर करणं बंद केल्याने त्यांचा शोध घेण्यास पोलिसांना अनेक अडचणी येत होत्या.
महिला कॉन्स्टेबल फुल विकताना दिसली
पोलिसांना अंजना यांनी एका बँकेत एटीएमचा वापर केल्याची माहिती मिळाली. त्यावरूनच तिचं लोकेशन शोधण्यास मदत झाली. अंजनाचा शोध घेण्यासाठी पोलीस वृंदावनमध्ये दाखल झाले तेव्हा महिला कॉन्स्टेबल फुल विकताना दिसल्या. सर्वांना मोठा धक्का बसला. एका कृष्ण मंदिराच्या बाहेर त्या फुलांची विक्री करत होत्या. पोलिसांनी त्यांना घरी येण्यासाठी विनंती केली. पण त्यांनी घरी येण्यास नकार दिला. महिला कॉन्स्टेबलने माझं कुटुंब नसून कोणीही नातेवाईक नसल्याचं म्हटलं आहे.
नोकरी करताना काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या त्रासाला ती कंटाळली
मिळालेल्या माहितीनुसार, अंजना सहिस महिला कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत होत्या. मात्र नोकरी करताना काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या त्रासाला त्या कंटाळल्या होत्या. याबाबत त्यांनी आपल्या काही सहकाऱ्यांसोबत चर्चा केली होती. नोकरीवरून त्यांच्या कुटुंबात देखील वाद होत असत. त्यामुळेच अंजना या सर्व गोष्टींना कंटाळल्या होत्या. वरिष्ठ अधिकारी आणि कुटुंबीय यांच्या त्रासाला कंटाळून त्यांनी घर सोडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्या गेल्या नऊ महिन्यांपासून बेपत्ता होत्या. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.