बिहारमधील भागलपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. लॉच्या परीक्षेत कॉपी करण्यापासून रोखल्याने एका महिलेने शिक्षकाला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. एवढेच नाही तर महिलेने शिक्षकाचे कपडेही फाडल्याचा आरोप आहे. भागलपूर विद्यापीठात लॉच्या सहाव्या सेमिस्टरची परीक्षा सुरू होती.
परीक्षेला बसलेल्या प्रीती कुमारी या महिलेला शिक्षकाने पेपर जवळ ठेवण्यापासून रोखलं असता, तिने गोंधळ सुरू केला. तिने शिक्षकाची कॉलर पकडून त्यांचा शर्ट फाडला. प्रीती कुमारीने मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या गार्डलाही थप्पड मारली.
महिलेची पोलिसांशी बाचाबाचीही झाली. महिलेने पोलीस कर्मचाऱ्याची काठी हिसकावली. मिळालेल्या माहितीनुसार, भागलपूर विद्यापीठात लॉ परीक्षेदरम्यान प्रीती कुमारी परीक्षेच्या सुमारे एक तास आधी परीक्षा हॉलमध्ये येऊन बसली होती.
शिक्षकाने तिला बाहेर जाण्याचा आदेश दिल्यावर ती तयार झाली नाही आणि परीक्षा हॉलमध्येच बसून राहिली. परीक्षा सुरू झाल्यावर कोणतीही भीती न बाळगता तिने कॉपी करण्यासाठी आणलेला पेपर काढला आणि प्रश्नांची उत्तरे लिहायला सुरुवात केली. कॉपी करताना शिक्षकाने पाहिल्यानंतर तिला रोखण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर महिलेने गोंधळ सुरू केला.
परीक्षा हॉलमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा सुरू झाला आणि शिक्षकाचे कपडे फाडून महिलेने गार्डला मारलं. मात्र, या गोंधळानंतर महिलेला बाहेर काढण्यात आले. घटनेबाबत परीक्षा केंद्रप्रमुखांना प्रश्न विचारला असता त्यांनी सांगितले की, उमेदवाराला बाहेर काढण्यात आले असून अहवाल विद्यापीठाला पाठवण्यात आला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.