नवी दिल्ली - भारतीय किसान यूनियन (BKU)चे प्रवक्ता राकेश टिकैत यांनी गाझीपूर अंडरपासवर शेतकऱ्यांच्या जमावाला भडकावले होते, असा दावा दिल्लीपोलिसातील निरीक्षक (इंस्पेक्टर) पुष्पलता यांनी केला आहे. यातच टिकैत यांनीही एक असे वक्तव्य केले आहे, ज्यामुळे दिल्ली पोलिसांची शंका अधिकच बळावली आहे. लाल किल्ल्यावर पोलिसांनी गोळी का चालवली नाही? असे वक्तव्य राकेश टिकैत यांनी केले आहे. विशेष म्हणजे हे वक्तव्य त्यांनी संयुक्त किसान मोर्चाच्या बैठकीत केले आहे.
राकेश टिकैत यांच्या वक्तव्याचा अर्थ काय? राकेश टिकैत यांच्या या वक्तव्यावर आता लोक प्रश्न उपस्थित करू लागले आहेत. लोक प्रश्न करत आहेत, की लाल किल्ल्यावर उपद्रव केला, की पोलीस गोळी चालवण्यास मजबूर होतील आणि नंतर देशभरात उद्रेक होईल, अशीच त्यांची योजना होती का? तर दुसरीकडे दिल्ली पोलिसांनी टिकैत यांना नोटीस बजावत, त्यांनी तीन दिवसांत सांगावे, की दिलेला शब्द मोडल्याबद्दल त्यांच्याविरोधात कारवाई का केली जाऊ नये? असे म्हटले आहे.
राकेश टिकैत यांच्या टेंट बाहेर लावण्यात आली नोटीस -दिल्ली पोलिसांनी गाझीपूर बॉर्डरवर आंदोलन स्थळी जाऊन टिकैत यांच्या टेंटला नोटीस लावली आहे. या नोटिशीत, 'आपल्याला अपल्या संघटनेशी संबंधित, असे हिंसक कृत्य करणाऱ्या गुन्हेगारांची नावे सांगण्याचे निर्देश दिले जात आहेत. आपल्याला 3 दिवसांच्या आत आपले उत्तर द्यायचे आहे,' असे म्हणण्यात आले आहे.
इंस्पेक्टर पुष्पलता यांचा दावा -राकेश टिकैत यांच्या हेतूवर उपस्थित झालेला प्रश्न अत्यंत गंभीर आहे. कारण, गाझीपूर बॉर्डरहून लाल किल्ल्याकडे जाण्यासाठी राकेश टिकैत यांनी शेतकऱ्यांना केवळ प्रेरितच केले नाही, तर त्यांचे नेतृत्वही केले. टिकैत यांच्या नेतृत्वाखाली ट्रॅक्टरवरील शेतकऱ्यांची रॅली गाझीपूर बॉर्डरहून दिल्लीकडे वळल्यानंतर दिल्ली पोलिसातील दोन महिला कर्मचाऱ्यांनी ती आडवली. त्या ट्रॅक्टरसमोर उभ्या राहिल्या. यानंतर शेतकऱ्यांनी बॅरिकेड तोडून दुसरीकडून पुढे जाण्याचा प्रयत्न केला. यावर इंस्पेक्टर पुष्पलता आणि पोलीस कर्मचारी सुमन कुशवाहा ट्रॅक्टरच्या बोनटला लटकल्या. हे सर्व राकेश टिकैत यांच्या उपस्थितीत सुरू होते.
पुष्पलता या गाझीपूर अंडरपासवर तैनात होत्या. त्यांनी सांगितले, की ट्रॅक्टर परेड सुरू होण्याची निर्धारित वेळ 12 वाजताची होती. मात्र, 9.30 वाजता ही रॅली सुरू करण्यात आली. यावेळी अंडरपासच्या उल्ट्या दिशेने आनंद विहारकडे जात असलेल्या लोकांतील काही लोक परत आले आणि अंडरपासमध्ये लागलेले बॅरिकेड तोडू लागले. एका वृत्तवाहीनीशी बोलताना पुष्पलता यांनी सांगितले, "राकेश टिकैत आमच्याकडे दोन-तीन वेळा आले. ते आमच्या समोर शेतकऱ्यांना ट्रॅक्टर बंद करायला सांगत होते, मात्र इशारा, पुढे सरकण्याचा करत होते."