Bijapur Naxal Encounter:छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांविरोधात सुरक्षा दलाने कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे नक्षलविरोधी अभियानांतर्गत पोलीस दलाला यश मिळत आहे. सोमवारी सकाळपासून दंतेवाडा-विजापूर सीमेवर परिसरात सुरु असलेल्या चकमकीतही सुरक्षा दलाला मोठं यश हाती आलं. सुरक्षा दलाच्या चकमकीत एक जहाल महिला नक्षलवादी ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. या महिला नक्षलवाद्याच्या डोक्यावर २५ लाखांचे बक्षीस होतं. महिला नक्षलवाद्याकडून एक इन्सास रायफलही जप्त करण्यात आली आहे.
छत्तीसगडमधील विजापूर आणि दंतेवाडा सीमेवर सोमवारी सकाळी जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये जोरदार चकमक झाली. या चकमकीत जवानांनी एका महिला नक्षलवाद्याचा खात्मा केला. जवानांनी महिला नक्षलवाद्याचा मृतदेह ताब्यात घेऊन ओळख पटवण्यास सुरु केली. त्यावेळी ही महिला नक्षलवादी रेणुका उर्फ बानू उर्फ सरस्वती असल्याचे समोर आलं. रेणुकावर २५ लाखांचे बक्षिस होते. सुरक्षा दलाच्या जवानांनी घटनास्थळावरून इन्सास रायफल, स्फोटके आणि अनेक वस्तू जप्त केल्या आहेत.
रेणुका ही तेलंगणाच्या वारंगल इथली होती.ती दंडकारण्य विशेष क्षेत्रीय समितीच्या प्रेस टीमची प्रभारी होती. अनेक मोठ्या हल्ल्यांमध्ये रेणुकाचा सहभाग होता. दुसरीकडे गेल्या आठवड्यात दंतेवाडा जिल्ह्यात मंगळवारी सुरक्षा दलांनी केलेल्या चकमकीत तीन नक्षलवाद्यांना ठार केले होते. दंतेवाडा आणि विजापूरच्या सीमावर्ती भागात झालेल्या चकमकीत २५ लाखांचे बक्षीस असलेला नक्षलवादी सुधीर उर्फ सुधाकर उर्फ मुरली मारला गेला. मुरली उर्फ सुधीर दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटीचा सदस्य होता.
दरम्यान, सुरक्षा दलाचे डीआरजी पथक दंतेवाडा येथील गीदाम आणि विजापूरमधील भैरमगढ पोलीस स्टेशनच्या सीमावर्ती गावातील नेलगोडा, एकेली आणि बेलनार या भागात नक्षलविरोधी अभियाना राबवत आहे. सोमवारी सकाळी नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरु झाला. यामध्ये सुरक्षा दलांनी रेणुकाला ठार केले. दुसरीकडे, बस्तर रेंजमध्ये या वर्षात आतापर्यंत ११९ नक्षलवाद्यांना ठार करण्यात आलं आहे.