- एस. पी. सिन्हा
पाटणा : मृत जाहीर झालेली महिला बिहारच्या मुजफ्फरपूरमधील सीबीआय कोर्टात साक्ष देण्यासाठी शुक्रवारी हजर झाली तेव्हा सर्व जण आश्चर्यचकित झाले. मी जिवंत आहे, मेलेली नाही. मला सीबीआयने मृत घोषित केले आहे, असे वृद्ध महिलेने न्यायाधीशांना सांगितले. या प्रकाराबाबत न्यायालयाने सीबीआयकडून स्पष्टीकरण मागितले आहे.
सिवानचे बहुचर्चित पत्रकार राजदेव रंजन हत्याकांडात बदामी देवी यांची साक्ष नोंदवली जाणार होती. परंतु सीबीआयने आपल्या कागदपत्रांमध्ये त्यांना मृत घोषित केले व कागदपत्रे कोर्टात सादर केली. शुक्रवारी प्रत्यक्ष बदामी देवीच कोर्टात हजर झाल्याने सर्वजण आश्चर्यचकित झाले.
सीबीआय अडचणीत
बदामी देवीने सांगितले की, मी जिवंत आहे. माझे वीरेंद्र पांडेय याच्याशी भांडण झाले होते. त्यामुळे त्याने मी मृत झाल्याचे सांगितले. मात्र, बदामी देवीच प्रत्यक्ष हजर झाल्याने सीबीआय अडचणीत सापडली.