Cyclone Fengal Latest News: बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे चक्रीवादळात रुपांतर होणार आहे. या चक्रीवादळाला फेंगल (cyclone fengal) नाव देण्यात आले असून, भारतीय हवामान विभागाने अनेक राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. या चक्रीवादळाचा अनेक राज्यांना तडाखा बसण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. काही राज्यांना हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे.
बंगालच्या खाडीत तयार झालेल्या कमी दाबाचा पट्टा चक्रीवादळात रुपांतरित होत असून, हे फेंगल चक्रीवादळ लवकरच किनारपट्टीवर धडकणार आहे. या चक्रीवादळामुळे तामिळनाडू, आंध्र प्रदेश, केरळ पासून ते पंजाबपर्यंत हवामानात बदल होणार आहे.
फेंगल चक्रीवादळामुळे अनेक राज्यात वेगवान वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तामिळनाडूतील अनेक जिल्ह्यात शाळा-महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, २७ नोव्हेंबर रोजी चक्रीवादळ तयार झाले आहे. त्यानंतर वादळाची तीव्रता वाढणार आहे. त्यानंतर पुढील दोन दिवस हे चक्रीवादळ श्रीलंकेच्या किनारपट्टीपासून तामिळनाडूची किनारपट्टी आणि उत्तर पश्चिम दिशेने कूच करेल. त्यामुळे किनारपट्टी भागातील राज्यात अतिमुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे.
कोणत्या राज्यांना रेड अलर्ट
हवामान विभागाने फेंगल चक्रीवादळामुळे हवामानात बदल होणार असल्याचे म्हटले आहे. तामिळनाडू आणि पुद्दुचेरी मध्ये २७ ते ३० नोव्हेंबर दरम्यान अतिमुसळधार ते मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे.
केरळमध्ये २७ नोव्हेंबर रोजी अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. आंध्र प्रदेश, रायलसीमा भागात २८ ते ३० नोव्हेंबर दरम्यान अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा भागात २८ नोव्हेंबर रोजी अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे.
फेंगल चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर इंडिगोकडून चेन्नई, तुतीकोरिन आणि मदुरै येथून येणाऱ्या आणि जाणाऱ्या विमानसेवांसाठी सूचना जारी करण्यात आल्या आहेत. प्रतिकूल हवामानामुळे चेन्नई, तुतीकोरिन आणि मदुरै या ठिकाणच्या सेवांवर परिणाम झाला आहे.