लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव लोकचळवळीचे रूप घेत असल्याचे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २ ऑगस्ट ते १५ ऑगस्टदरम्यान आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर तिरंग्याचे प्रोफाइल पिक्चर ठेवण्याचे आवाहन देशवासीयांना केले. ते रविवारी मन की बात या नभोवाणी कार्यक्रमात बोलत होते.
स्वातंत्र्याला ७५ वर्षे झाल्यानिमित्त स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव हा उपक्रम घेण्यात येत असून, त्याचाच एक भाग म्हणून १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्टदरम्यान ‘हर घर तिरंगा’ या विशेष अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. या अभियानात सहभागी होत सर्वांनी आपल्या घरावर तिरंगा फडकवावा. त्याचबरोबर तिरंग्याची रचना करणारे पिंगली व्यंकय्या यांची २ ऑगस्टला जयंती असल्याने २ ते १५ ऑगस्टदरम्यान नागरिकांनी आपापल्या सोशल मीडिया अकाउंटवर तिरंगा ध्वजाचे प्रोफाइल पिक्चर ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले.
स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आता लोकचळवळीचे रूप घेतोय. या अंतर्गत देशभर आयोजित विविध कार्यक्रमांत समाजाच्या सर्व स्तरातील नागरिक सहभाग घेत असल्याचे पाहून मला आनंद होत आहे. १५ ऑगस्टला भारत जेव्हा स्वातंत्र्याची पंचाहत्तरी पूर्ण करेल तेव्हा आपण सर्व एका भव्य ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार बनणार आहोत. आजची पिढी स्वातंत्र्याच्या ७५व्या वर्धापन दिनाची साक्षीदार बनत आहे. हे या पिढीचे परमभाग्य आहे, असे ते म्हणाले.
अमृतकाळ हा कर्तव्यकाळआम्ही जर गुलामगिरीच्या युगात जन्मलो असतो तर आम्हाला आजच्या दिवसाची कल्पना कशी करता आली असती, असा प्रश्न करून मोदी म्हणाले की, स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त आयोजित सर्व कार्यक्रमांतून देशवासीयांसाठी एकच मोठा संदेश आहे, तो म्हणजे सर्वांनी आपल्या कर्तव्याचे पूर्ण निष्ठेने पालन करावे. हे केले तरच आपण असंख्य स्वातंत्र्यसैनिकांचे स्वप्न पूर्ण करू शकू. त्यांच्या स्वप्नातील भारत घडवू शकू. त्यामुळेच आमचा पुढील २५ वर्षांचा हा अमृत काळ खऱ्या अर्थाने कर्तव्यकाळ आहे, असेही ते म्हणाले.
७५ रेल्वेस्थानकांवर विविध कार्यक्रमभारताच्या स्वातंत्र्य चळवळीशी देशातील अनेक रेल्वेस्थानकांचा संबंध आहे. २४ राज्यांतील अशी ७५ रेल्वेस्थानके निवडण्यात आली असून, तेथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे, असे मोदी यांनी नमूद केले. यावेळी त्यांनी भारतीय क्रीडापटू आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी करत असल्याचे सांगून त्यांची प्रशंसा केली.