हैदराबाद : भारत बायोटेक या कंपनीने कोवॅक्सिन लस बनविण्याचा फॉर्म्युला इतर कंपन्यांना देण्याची तयारी दर्शविल्यानंतर नीती आयोगाने अशा कंपन्यांना पुढे येण्याचे आवाहन केले आहे. मात्र कोवॅक्सिन लस बनविण्यासाठी लागणारी सुसज्ज यंत्रसामग्री खूपच कमी कंपन्यांकडे आहे.
बायोकॉन या कंपनीच्या संस्थापक किरण मुजुमदार यांनी म्हटले आहे की, जिवंत विषाणूंशी संबंधित कोणत्याही बाबींवर सध्या कोणाचीही काम करण्याची इच्छा नाही. साऱ्या जगात तशी हिंमत सध्या कोणीही दाखवताना दिसत नाही. त्यामुळे बहुतांश कंपन्यांचा प्रथिनाधारित लसी बनविण्याकडे कल आहे. मात्र महामारीच्या काळात जिवंत विषाणूंना निष्क्रिय करून त्यांच्या आधारे लस बनविण्याचा मार्ग सर्वात जवळचा आहे. लसींची कमतरता दूर करण्यासाठी कोवॅक्सिनचे उत्पादन करण्याकरिता इतर कंपन्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. मात्र किती जण त्याला प्रतिसाद देतात हे पाहण्यासारखे आहे.
शांता बायोटेकचे संस्थापक के. आय. वरप्रसाद रेड्डी यांनी सांगितले की, कोणतीही लस बनविण्याचा फॉर्म्युला नसतो, तर त्याची प्रक्रिया व तंत्र असते. ते इतर कंपन्यांना मिळाले तरी त्यांना ती लस उत्पादित करायला आणखी सहा ते आठ महिने लागतील. जिवंत विषाणू हाताळून त्यांच्या वापरातून लसनिर्मिती करण्याचे कर्मचाऱ्यांना शिक्षण देण्यासाठी किमान सहा महिने लागतात. लस बनविणे हे इतके सोपे नाही.