नातेवाइकांसाठी नेत्यांची फिल्डिंग
By admin | Published: January 24, 2017 2:04 PM
आगामी महापालिका निवडणुकीत राजकारणात पदार्पण करण्यासाठी राजकारणी नेत्यांच्या पुढच्या पिढीने जोरदार तयारी केली असून, किमान ५० हून अधिक नातेवाइकांनी त्यांच्या पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे़
पुणे : डॉक्टरचा मुलगा डॉक्टर होतो, इंजिनिअरचा मुलगा इंजिनिअर होतो, तसेच राजकारणीचा मुलगा, मुलगी, सून, पत्नी हे राजकारणी होत आहेत़ आगामी महापालिका निवडणुकीत राजकारणात पदार्पण करण्यासाठी राजकारणी नेत्यांच्या पुढच्या पिढीने जोरदार तयारी केली असून, किमान ५० हून अधिक नातेवाइकांनी त्यांच्या पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे़
राजकारणातील घराणेशाहीला सातत्याने विरोध करणाºया भारतीय जनता पक्षाकडे यंदा सर्वाधिक नेत्यांच्या नातेवाइकांनी उमेदवारीसाठी मुलाखती दिल्या आहेत़ त्यात प्रामुख्याने खासदार अनिल शिरोळे यांचे पुत्र सिद्धार्थ शिरोळे यांची उमेदवारी प्रभाग क्रमांक १४मधून तगडी मानली जात आहे़ त्यांच्या उमेदवारीला विरोध करण्यासाठी या प्रभागातील भाजपामधील काही इच्छुक एकत्र आले आहेत़ पण, सिद्धार्थ शिरोळे यांच्या उमेदवारीला थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाच पाठिंबा असल्याचे सांगितले जात आहे़ आमदार योगेश टिळेकर यांचा भाऊ राहुल टिळेकर हेही हडपसरमधून इच्छुक आहेत़ नगरसेविका शशिकला मेंगडे व शिवराम मेंगडे यांचे पुत्र सुशील मेंगडे हे यंदा महापालिकेत प्रवेश करण्यास इच्छुक आहेत़ काँग्रेसचे नेते भारत सावंत यांच्या सून आणि नगरसेविका शीतल सावंत यांनी नुकताच भाजपामध्ये प्रवेश केला असून, त्यांनीही पक्षाकडे तिकीट मागितले आहे़ आमदार भीमराव तापकीर यांचे पुतणे अभिजित तापकीर इच्छुक आहेत़ राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दीपक मानकर यांचे पुत्र राघवेंद्र मानकर यांनी भाजपामध्ये प्रवेश केला, तेही इच्छुक आहेत़ भाजपामध्ये प्रवेश केलेले राजाभाऊ बराटे यांचे बंधू विठ्ठल यांनीही उमेदवारी मागितली आहे़
४राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही नेत्यांच्या इच्छुक नातेवाइकांची संख्या मोठी आहे़ नगरसेवक सतीश म्हस्के हे आपली पत्नी मीनाक्षी म्हस्के यांच्यासाठी उमेदवारी मागत आहते़ ज्येष्ठ नेते दत्ता बनकर यांची सून वैशाली बनकर या महिला प्रभागातून मागील वेळी निवडून येऊन महापौर झाल्या होत्या़ यंदा त्यांचे पती सुनील बनकर यांनी उमेदवारी मागितली आहे़ नगरसेवक दिलीप बराटे यांचा चुलतभाऊ अमर बराटे हे इच्छुक आहेत़ शिवाजी पवार हे आपली सून वर्षा पवार यांच्यासाठी प्रयत्न करीत आहेत़ ज्येष्ठ नेते प्रकाश म्हस्के यांचा मुलगादेखील लढण्याच्या तयारीत आहे.
४महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत बापू वागस्कर आणि वनिता वागस्कर हे दोघेही पतीपत्नी सध्या नगरसेवक आहेत़ मनसेमधील माजी गटनेत्यांनी आपल्या पत्नीसाठी उमेदवारी मागितली आहे़ शिवसेनेतील काही जण आता दुसºया टर्मसाठी तयारीत आहेत़
४काँग्रेस पक्षात काहींनी आपल्याबरोबरच पत्नीलाही तिकीट मिळावे, अशी मागणी
पक्षाकडे केली होती़ पण, काँग्रेस पक्षाने एका घरात एकच उमेदवारी देण्याचे निश्चित केले आहे़ त्यामुळे अनेकांची कोंडी झाली असून, आपण महापालिकेत जायचे की मुलाला पाठवायचे, असा संभ्रम काही जणांना पडला आहे़ तर काहींनी सरळ दुसºया पक्षाचा रस्ता पकडला आहे़ शिवाजी केदारी यांचा मुलगा साहिल केदारी यंदा इच्छुक आहे़ नगरसेविका मीनल सरोदे यांचे पती आनंद सरोदे हे यंदा इच्छुक आहेत़ कैलास गायकवाड हे आपली मुलगी आदिती हिच्यासाठी प्रयत्न करीत आहेत़ जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती रामभाऊ बराटे यांचा मुलगा सचिन बराटे यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे़ याशिवाय दत्ता आणि संगीता गायकवाड, रेखा आणि मिलिंद पोखळे, जयश्री आणि आबा बागुल, लता आणि अमोल राजगुरू या पती-पत्नींनी उमेदवारी मागितली आहे़