नवी दिल्ली - 'राहुल गांधीने लहानपणापासून खूप सोसलं आहे. त्याने राजकारणात आल्यावर अशा भयंकर व्यक्तीचा सामना केला ज्याने त्याला अजून निर्भय आणि मजबूत केलं', असं म्हणत काँग्रेसच्या मावळत्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी नरेंद्र मोदींवर अप्रत्यक्ष टीका केली. राहुल गांधी यांनी आज काँग्रेस अध्यक्षपदाची सुत्रं हाती घेतली आहेत. काँग्रेसचे केंद्रीय निवडणूक समितीचे अध्यक्ष मुल्लापल्ले रामचंद्रन यांनी राहुल गांधींना अध्यक्षपदाचं प्रमाणपत्र देत, सूत्रं सोपवली. यावेळी माजी अध्यक्ष सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंह, यांच्यासह काँग्रेसचे सर्व दिग्गज नेते उपस्थित होते. यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना सोनिया गांधी यांनी आपल्या राजकीय प्रवासाबद्दल सांगितलं. तसंच भाजपा सरकारवरही जोरदार टीका केली.
'राहुल गांधी माझा मुलगा असल्याने त्याचं कौतुक करणं चुकीचं ठरेल. लहानपाणासून त्याने दुख: सोसलं आहे. राहुलने राजकारणात आल्यावर अशा भयंकर व्यक्तीचा सामना केला ज्याने त्याला अजून निर्भय आणि मजबूत केलं आहे. मला त्याच्या सहनशीलतेचा गर्व वाटतो. मला पुर्ण विश्वास आहे की पक्षाचं नेतृत्व तो योग्य पद्धतीने करेल', असा विश्वास सोनिया गांधींनी व्यक्त केला.
20 वर्षांपूर्वी काँग्रेस अध्यक्षपदाची धुरा हाती घेताना माझे हात थरथरत होते अशी आठवण त्यांनी यावेळी सांगितली. 'ज्या कुटुंबात मी आले ते एक क्रांतिकारी कुटुंब होतं. इंदिरा गांधी त्याच कुटुंबाच्या सदस्य होत्या. इंदिरा गांधींनी मला मुलीप्रमाणे वागवलं. भारताच्या संस्कृतीशी ओळख करुन दिली. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर आई दुरावल्याची माझी भावना होती. त्यानंतर माझं आयुष्य पालटलं', हे सांगताना सोनिया गांधी भावूक झाल्या होत्या. यादरम्यान फटाक्यांच्या आवाजामुळे दोन वेळा सोनिया गांधींना भाषण थांबवावं लागलं.
'इंदिरांच्या हत्येनंतर सात वर्षांनी माझ्या पतीचीही हत्या झाली, माझा आधार माझ्यापासून हिसकावला. पक्ष अडचणीत असल्याने मला पक्षाच्या कार्यकर्त्यांचा आवाज ऐकू आला. आपलं कर्तव्य समजत मी राजकारणात आले', असं त्या म्हणाल्या.
'मी काँग्रेस अध्यक्षपदाची सूत्रं स्वीकारली त्यावेळी आमच्याकडे फक्त 3 राज्य होती, केंद्राची सत्ता दूर होती. पण नंतर आम्ही डझनपेक्षा जास्त राज्यात सत्ता मिळवली. जेवढं मोठं आव्हान आज आपल्यासमोर आहे, तेवढं कधीच नव्हतं. आव्हानं खूप आहेत, पण आम्ही घाबरणारे नाहीत, झुकणारे नाहीत', असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.