गोरखपूर : उत्तर प्रदेशातील गोरखपूरमध्ये वर्गशिक्षिकेने शिक्षा केली म्हणून इयत्ता पाचवीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्यांने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या विद्यार्थ्याने निराश होऊन आत्महत्येचं पाऊल उचललं आहे. नवनीत प्रकाश असं या विद्यार्थ्याचं नाव आहे. शाहपूर भागातील सेंट अँथनी स्कूलचा विद्यार्थी असलेल्या नवनीतला त्याच्या वर्गशिक्षिकेने शिक्षा केल्यामुळे त्याने घरी विष पिऊन आत्महत्या केली. नवनीतचे वडील रवी प्रकाश यांनी पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत ही बाब नमूद केली आहे. नवनीतला तात्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं पण तेथे त्याचा मृत्यू झाला.
नवनीतच्या दप्तरात सापडलेल्या एका चिठ्ठीतून त्याच्या आत्महत्येमागील कारण समोर आलं आहे. माझ्या शिक्षिकेने मला वर्गात तीन तास उभं राहायला सांगितलं. तसंच कोंबडा बनून उभं केलं होतं, असं त्याने चिठ्ठीत लिहिलं आहे. मी आता मरायचं ठरवलं आहे. मॅडमने आणखी कुठल्या विद्यार्थ्यांला अशी शिक्षा देऊ नये, अशी माझी शेवटची इच्छा आहे’, असंही त्याने चिठ्ठीत लिहिलं होतं. वर्गशिक्षिकेने शिक्षा केल्याने निराश झालेल्या मुलाने 15 सप्टेंबर रोजी विष प्यायलं होतं. त्याची प्रकृती खालावल्याने त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं पण हॉस्पिटलमध्ये त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर मुलाच्या कुटुंबीयांनी शाळेत जाऊन गोंधळ घातला होता. तसंच शिक्षिकेला अटक करण्याची मागणीही केली. दरम्यान रवी प्रकाश यांच्या तक्रारीवरून वर्गशिक्षिका भावना जोसेफ आणि शाळा व्यवस्थापन यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला असून शिक्षिकेला अटक करण्यात आली आहे.
माझ्या मुलाबरोबर जे झालं तसं इतर मुलांबरोबर होऊ नये, यासाठी याप्रकरणी कठोर कारवाई व्हायला हवी, माझ्या मुलाने सुसाइड नोटमध्ये असं कोणाबरोबर होऊ नये यासाठी कारवाईची मागणी केली आहे, त्याची पूर्तता व्हावी, अशी प्रतिक्रिया नवनीतच्या वडिलांनी दिली आहे.
काही दिवसांपूर्वी गुरूग्रामच्या रायन इंटरनॅशनल स्कूलमध्ये एका सात वर्षीय मुलाची हत्या करण्यात आली होती. या चिमुरड्याच्या हत्येनंतर शाळेतील मुलांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.