PM मोदींना कोण देऊ शकतं तगडी टक्कर? देशवासीयांनी सांगितली ‘मन की बात’
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2022 11:04 AM2022-01-21T11:04:20+5:302022-01-21T11:05:11+5:30
एका सर्व्हेत नरेंद्र मोदींच्या विरोधात पंतप्रधानपदाचा प्रमुख दावेदार म्हणून राहुल गांधी यांना किती टक्के पसंती मिळाली? जाणून घ्या...
नवी दिल्ली: देशभरात पाच राज्यांच्या निवडणुकांसह २०२४ मध्ये असलेल्या लोकसभा निवडणुकीसाठीही अनेक पक्षांकडून आतापासूनच मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. इतकेच नव्हे तर अनेकांनी लोकसभा निवडणुकीचे अंदाजही वर्तवण्यास सुरुवात केली आहे. आताच्या घडीला देशात लोकसभा निवडणूक झाली, तर पंतप्रधाननरेंद्र मोदी टक्कर कोण देऊ शकते, यावर देशवासीयांची मते जाणून घेण्यात आली. त्यामध्ये देशवासीयांनी सांगितलेली मन की बात धक्कादायक असल्याचे सांगितले जात आहे.
इंडिया टुडे आणि सी-व्होटर यांनी केलेल्या सर्वेक्षणात देशात आता लोकसभा निवडणूक झाल्यास पंतप्रधानपदासाठी कोणत्या नेत्यांमध्ये चांगली टक्कर होऊ शकते, याबाबत देशवासीयांचा कल जाणून घेतला. यामध्ये विरोधी पक्षातून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना सर्वाधिक मते मिळाली. या सर्वेक्षणात सहभागी झालेल्यांपैकी १७ टक्के लोकांनी ममता बॅनर्जी यांना पंतप्रधान मोदी यांना टफ फाईट देऊ शकतात, असे म्हटले आहे.
ममता बॅनर्जी देऊ शकतात पंतप्रधान मोदींना टक्कर
नरेंद्र मोदी यांच्याविरोधात पंतप्रधानपदासाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी चांगली स्पर्धा करू शकतात, असे १७ टक्के लोकांना वाटते. तर ममता बॅनर्जी यांच्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पंतप्रधान मोदींचे दुसरे मोठे स्पर्धक म्हणून लोकांनी पसंती दिली आहे. या सर्व्हेत अरविंद केजरीवाल यांना १६ टक्के यांना मते मिळाली आहेत. तर काँग्रेसचे नेते आणि खासदार तसेच पंतप्रधानपदाचा चेहरा मानले जात असणारे राहुल गांधी यांना केवळ ११ टक्के लोकांनी पसंती दिली आहे. पंतप्रधानपदाच्या शर्यतीत राहुल गांधी तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले आहेत.
पंतप्रधान मोदींनंतर भाजपचा चेहरा कोण?
भाजपमध्ये आताच्या घडीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर कोण, यासंदर्भातही सर्व्हेमध्ये प्रश्न विचारण्यात आले होते. यामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना सर्वाधिक मते मिळाली असून, २४ टक्के लोकांनी पसंती दर्शवली आहे. यानंतर उत्तर प्रदेशचे योगी आदित्यनाथ यांना २३ टक्के लोकांनी पसंती दर्शवली आहे. तर, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांना ११ टक्के लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे उत्तराधिकारी म्हणून पसंती दिली आहे.