उत्तराखंडचे अर्थमंत्री प्रेमचंद अग्रवाल आणि एका स्थानिक तरुणात जोरदार हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हाणामारीची ही घटना ऋषिकेश येथील अर्थमंत्र्यांच्या घराजवळ घडली. या घटनेचा एक व्हि़डीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये सुरेंद्र सिंह नेगी नावाचा तरुण आणि मंत्री यांच्यात जोरदार हाणामारी होत असल्याचे दिसत आहे.
अर्थमंत्री आणि त्यांचे सुरक्षा कर्मचारी देखील भररस्त्यात तरुणाला मारहाण करताना दिसत आहेत. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मात्र या घटनेनंतर मंत्र्यानी शिवीगाळ, मारहाण, कपडे फाडणे, लूटमार केल्याचा आरोप केला आहे. तर दुसरीकडे पीडित तरुणानेही फेसबुक पोस्ट करून आपली बाजू मांडली आहे. काहीही केलं नसताना मंत्री आणि त्यांच्या अधिकाऱ्यांनी आपल्यावर हल्ला केल्याचा आरोप तरुणाने केला आहे.
सुरेंद्र सिंह नेगीने दिलेल्या माहितीनुसार, तो ट्रॅफिक जॅममध्ये अडकला होता, त्यांच्या गाडीत कोण बसले आहे हे न बघता तो त्यांच्या कारजवळून गेला, त्यानंतर त्यांनी मला शिवीगाळ केली आणि मी विरोध केल्यावर ते आपल्या गाडीतून बाहेर आले आणि खाली उतरून मारहाण करण्यास सुरुवात केली.
या संपूर्ण प्रकरणाची दखल घेत उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी पोलिसांना निष्पक्ष तपास करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच पोलिसांनी कोणत्याही निरपराधांना शिक्षा होणार नाही याची काळजी घ्यावी, असेही सांगितले. मंत्र्याला बोलावून मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यात पक्षपाती कारवाया कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतल्या जाणार नाहीत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"