लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली: शिवसेनेच्या दोन्ही गटांनी धनुष्यबाण निवडणूक चिन्हावर दावा करणारी कागदपत्रे व प्रतिज्ञापत्रे आज केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सादर केली. बहुसंख्य लोकप्रतिनिधी आमच्या बाजूने असल्याचा दावा एकनाथ शिंदे गटाने केला असून, ‘शिवसेना राजकीय पक्षा’ला धनुष्यबाण चिन्ह मिळावे, असा दावा केला तर शिवसेनेच्या घटनेनुसार सर्वोच्च निर्णय संस्था असलेल्या प्रतिनिधी समितीतील ७० टक्के प्रतिनिधी आमच्या बाजूने असल्याचा दावा उद्धव ठाकरे गटाने केला. दरम्यान, शिंदे गटाने केलेल्या दाव्यावर निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला शनिवारी दुपारी २ वाजेपर्यंत संबंधित कागदपत्रांसह आपले म्हणणे सादर करण्यास सांगितले आहे. या दोन्ही गटांच्या दाव्यांची पडताळणी करून निवडणूक आयोग आता निर्णय पुढील आठवड्यात घेण्याची शक्यता आहे.
अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेच्या कोणत्या गटाच्या उमेदवाराला शिवसेनेचे अधिकृत निवडणूक चिन्ह धनुष्यबाण मिळणार आहे, हा मुख्य सवाल उपस्थित झाला आहे. दोन्ही गटांना ७ ऑक्टोबरपर्यंत दाव्याची पुष्टी करणारी कागदपत्रे सादर करावयाची होती. शिंदे गटाने सकाळी साडेदहा वाजता कागदपत्रे सादर केली तर ठाकरे गटातर्फे सायंकाळी ४ वाजता कागदपत्रे निवडणूक आयोगाच्या सुपूर्द केली.
चिन्ह शिवसेना राजकीय पक्षाला (एसएसपीपी) द्या
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातर्फे आज ज्येष्ठ वकील उत्सव त्रिवेदी यांनी निवडणूक आयोगाकडे धनुष्यबाण चिन्ह मिळावे, यासाठी दावा केला आहे. यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात असलेल्या ‘शिवसेना राजकीय पक्षा’ला (एसएसपीपी) धनुष्यबाणाचे चिन्ह मिळावे, अशी मागणी केली आहे. निवडणूक चिन्ह आदेश कायदा, १९६८ नुसार हा अर्ज त्यांनी दाखल केला आहे.
सर्वाधिक प्रतिनिधींची लेखी प्रमाणपत्रे सादर
शिंदे गटाकडून विधानसभेतील ५५ पैकी ४० आमदार व १९ खासदारांपैकी १२ खासदार आमच्या बाजूने असल्याचा दावा केला आहे. यासोबत शिवसेनेचे प्राथमिक सदस्य म्हणून १ लाख ६६ हजार ७६४, शिवसेना राजकीय पक्षाचे प्रतिनिधी म्हणून १४४ व राज्य प्रभारी म्हणून ११ जणांचा पाठिंबा असल्याचा दावा करण्यात आला आहे. या सर्वांचे लेखी प्रतिज्ञापत्रही सादर केले आहे. निवडणूक आयोगाला सादर केलेल्या दाव्यात २६ जून २०२२ रोजी झालेल्या बैठकीत आमदारांनी एकनाथ शिंदे यांना शिवसेना राजकीय पक्षाचा नेता निवडल्याचा दावा केला आहे. त्याचप्रमाणे १८ जुलै २०२२ रोजी एसएसपीपीची प्रतिनिधी सभा झाली. यात एकनाथ शिंदे यांची मुख्य नेता व अध्यक्ष म्हणून निवड केल्याचा दावा यात केला आहे. गेल्या २७ जुलैला मुंबईत झालेल्या बैठकीत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केल्याचे निवेदनात म्हटले आहे.
प्रतिनिधी सभेवर ठाकरे गटाचा वरचष्मा
निवडणूक चिन्हावर दावा करताना ठाकरे गटाने शिवसेनेच्या सर्वोच्च निर्णय संस्था असलेली प्रतिनिधी सभेतील सदस्यांची संख्या दिलेली आहे. या प्रतिनिधी सभेत जवळपास २५० प्रतिनिधी आहेत. या प्रतिनिधी सभेने गेल्या जून महिन्यात झालेल्या बैठकीत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नावाला संमती दिलेली आहे. या प्रतिनिधी सभेतील काही लोकांना शिवसेनेने निलंबित केले आहे. यामुळे या प्रतिनिधी सभेतील बहुसंख्य सदस्य ठाकरे गटाकडे असल्याचा दावा शिवसेनेचे नेते खासदार अनिल देसाई यांनी केला आहे. निवडणूक आयोगाकडे शिवसेनेच्या घटनेप्रमाणे तालुकाप्रमुख, उपतालुकाप्रमुख, जिल्हाप्रमुख, उपजिल्हाप्रमुख, उपनेता व नेता अशी संघटनात्मक संरचना आहे. या पदांवरून काही लोकांना काढून शिवसेनेने नव्याने नियुक्ती केली आहे. या नव्या संघटनेतील बदलांची यादी व त्यांची प्रतिज्ञापत्रे सादर केलेली आहेत. याशिवाय ३६ लाख प्राथमिक सदस्य शिवसेनेचे असल्याचा दावाही खासदार देसाई यांनी केला.
एबी फॉर्मच्या अधिकारावरही दावा
विधानसभा व लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षाच्या उमेदवाराला एबी फॉर्म उमेदवारी अर्जासोबत सादर करणे आवश्यक आहे. हा फॉर्म देण्याची अधिकृत व्यक्तीची नियुक्ती पक्षप्रमुख किंवा अध्यक्ष करीत असतो. शिवसेनेमध्ये एबी फॉर्मवर स्वाक्षरी करण्याचा अधिकार शिवसेना नेते सुभाष देसाई व अनिल देसाई या दोन नेत्यांना आहे. हे दोन्ही नेते सध्या ठाकरे गटात असल्याने अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी सध्यातरी या दोन्ही नेत्यांच्या स्वाक्षरीने अधिकृत झालेला उमेदवार शिवसेनेचा अधिकृत उमेदवार राहणार आहे.
निर्णय दोन दिवसांत नाही, आयुक्त दिल्लीबाहेर
शिवसेनेच्या दोन्ही गटांनी केलेल्या दाव्यावर येत्या दोन दिवसांत निर्णय होण्याची शक्यता नाही. निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्य निवडणूक आयुक्त व निवडणूक आयुक्त दिल्लीत नाहीत.
पक्षप्रमुखपदाची मुदत जानेवारी २०२३ पर्यंत
शिवसेनेचे पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांची निवड २३ जानेवारी २०१८ रोजी झालेल्या शिवसेनेच्या प्रतिनिधी सभेत झालेली आहे. त्यांची मुदत जानेवारी २०२३ पर्यंत आहे. त्यामुळे शिवसेनेच्या घटनेनुसार उद्धव ठाकरे हेच शिवसेनेचे पक्षप्रमुख असल्याचा दावा निवडणूक आयोगाला दिलेल्या निवेदनात केल्याची माहिती खासदार देसाई यांनी पत्रकारांना दिली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"