उत्तर प्रदेशमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू आहे. सुहेलदेव भारतीय समाज पक्षाचे (SBSP) प्रमुख ओमप्रकाश राजभर हे योगी मंत्रिमंडळात आपल्याला स्थान मिळेल असा सातत्याने दावा करत आहेत. याबाबत त्यांनी अनेकदा तारखाही दिल्या आहेत. अशा स्थितीत मंत्रिमंडळाचा विस्तार झाला तर ओमप्रकाश राजभर नक्कीच मंत्री होतील, असं त्यांनी काल पुन्हा एकदा सांगितलं.
कल्की महोत्सवात सहभागी होण्यासाठी राजभर रविवारी संभल येथे पोहोचले होते. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी मंत्री बनण्याच्या इच्छेचा पुनरुच्चार केला आणि हिंदू देवतांवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल सपा नेते स्वामी प्रसाद मौर्य यांनाही लक्ष्य केलं. स्वामी प्रसाद मौर्य यांचं मानसिक संतुलन बिघडलं आहे. अखिलेश यादव यांच्या सूचनेनुसार ते बोलत आहेत. मतांसाठी हे सर्वकाही करत आहे असं राजभर यांनी म्हटलं.
समाजवादी पक्षावर हल्लाबोल करताना राजभर म्हणाले की, सपाला मत देणार्या 18 टक्के मुस्लिमांनाही हे समजले आहे की, त्यांनी द्वेषाशिवाय काहीही दिलं नाही. यूपीमध्ये चार वेळा सपाचे सरकार होते आणि अखिलेश यादव पाच वर्षे मुख्यमंत्री होते. आता जर आपण राजकीय सहभागाबद्दल किंवा नोकऱ्यांमधील वाटा याविषयी बोललो तर संभल जिल्ह्यातील कोणत्याही पोलीस ठाण्यात तुलना केली तर तुम्हाला 8 टक्के यादव दिसतील पण तुम्हाला 18 टक्के मतदान करणारे मुस्लिम सापडणार नाहीत.
ओमप्रकाश राजभर इथेच थांबले नाहीत, ते पुढे म्हणाले की, "आता जी आघाडी झाली आहे, त्यात नितीश, जयंत आणि अखिलेश यादव यांचे वेगवेगळे सूर आहेत, मग या परिस्थितीत प्रगती कशी होईल. सपा दिवसा भारतीय जनता पक्षाविरोधात बोलते आणि रात्री मोदी-योगींना पुष्पगुच्छ देऊन भेटते."