हिंडन हवाई तळ (उत्तर प्रदेश) : भारतीय हवाई दलात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करीत असलेल्या महिला वैमानिक लवकरच फायटर जेट अर्थात लढाऊ विमान चालवताना दिसतील. भारतीय हवाई दलाचे प्रमुख एअर चिफ मार्शल अरुप राहा यांनी गुरुवारी याबाबतचे संकेत दिले.हवाई दलाच्या ८३व्या वर्धापनदिनी जवानांना संबोधित करताना त्यांनी या प्रस्तावाची माहिती दिली. हवाई दलातील महिला सध्या मालवाहू विमाने आणि हेलिकॉप्टर उडवतात. यापुढच्या टप्प्यात हवाई दलाच्या महिला वैमानिक लढाऊ विमान चालवताना दिसतील. संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी मे महिन्यात महिलांच्या सुरक्षिततेच्या भीतीने त्यांना सशस्त्र दलांच्या लढाऊ शाखेत सामील करण्यास इन्कार केला होता. मात्र सैन्य दलांतील अन्य आघाड्यांवर महिलांना प्रोत्साहन दिले जाईल, असे त्यांनी म्हटले होते. - हवाई दलात १३००पेक्षा अधिक महिला आहेत. यात ९४ वैमानिक आणि १४ नेविगेटर आहेत. - अमेरिका, इस्रायल व पाकसारख्या अनेक देशांत महिला लढाऊ वैमानिक आहेत. हवाई कसरतींची सचिनला पडली भुरळ...हवाई दलाच्या ८३व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमास हवाई दलाचा आॅननरी ग्रुप कॅप्टन सचिन तेंडुलकर यानेही हजेरी लावली. हवाई दलाच्या गणवेशातील त्याची उपस्थिती या सोहळ्याचे आकर्षण ठरली. हवाई कसरतींचा स्वत:च्या मोबाइलने काढलेला व्हिडीओ सचिनने इन्स्टाग्रामवरही टाकला.
लढाऊ विमानही महिलांच्या हाती
By admin | Published: October 09, 2015 5:27 AM