नवी दिल्ली, दि. 21 - चीन आणि पाकिस्तान या दोन शेजारी देशांकडून असलेला धोका लक्षात घेता येत्या काळात भारतीय सैन्य दलांना आपल्या ताफ्यात अत्याधुनिक लढाऊ विमाने, शस्त्रसज्ज गाडया, पाणबुडया आणि हेलिकॉप्टर्सचा समावेश करावा लागणार आहे. ही सर्व सामग्री खरेदी करण्यासाठी भारताची योजना देखील तयार आहे. पण अब्जावधी डॉलर्सचा हा व्यवहार त्याचवेळी प्रत्यक्षात येईल जेव्हा हे सर्व साहित्य 'मेड इन इंडिया' असेल.
जगातील शस्त्रास्त्रांचा सर्वात मोठा आयतदार देश असलेल्या भारताने शस्त्रास्त्रांच्या खरेदीसाठी नवीन धोरण आखले आहे. नव्या धोरणात संरक्षण साहित्यांची निर्मिती करणा-या कंपन्यांना भारतात येऊन कारखाने सुरु करण्याची अट घालण्यात आली आहे. पाणबुडया निर्मितीच्या कार्यक्रमासाठी येत्या जुलै महिन्यात निविदा काढण्यात येतील.
या धोरणामुळे भारतात रोजगार निर्मितीला चालना मिळेल तसेच, मुख्य संरक्षण तंत्रज्ञान भारताला मिळेल. अनेक परदेशी कंपन्यांनीही नवीन धोरणानुसार शस्त्रास्त्र निर्मितीमध्ये रस दाखवला आहे. युरोपियन ग्रुप एअरबस भारताला पँथर हेलिकॉप्टर्स विकण्याचा प्रयत्न करत आहे. भारताकडून अब्जावधील डॉलर्सचे कंत्राट मिळाले तर, इथेच मुख्य केंद्र स्थापन करु असे एअरबसने म्हटले आहे.
दोन महिन्यांपूर्वी अमेरिकेतील लॉकहीड मार्टिन कंपनीने भारतात एफ-16 लढाऊ विमाने बनवण्याची घोषणा केली होती. यासंबंधी लॉकहीड मार्टिन आणि टाटा उद्योग समूहातील टाटा अॅडव्हान्स्ड सिस्टिम्स या कंपन्यांमध्ये येथे सुरू असलेल्या ‘पॅरिस एअर शो’मध्ये सोमवारी अधिकृत करार झाला.या करारानुसार लॉकहीड मार्टिन कंपनी ‘एफ-१६’ विमानांचे उत्पादन करणारा त्यांचा अमेरिकेच्या टेक्सास राज्यात फोर्ट वर्थ येथे असलेला संपूर्ण कारखाना भारतात स्थलांतरित केला जाणार आहे. भारतातील कारखाना लॉकहीड मार्टिन व टाटा कंपनी संयुक्तपणे चालवतील. तेथे भारतीय हवाई दलाखेरीज जगातील इतर देशांना निर्यात करण्यासाठीही ‘एफ-१६’ लढाऊ विमानांचे उत्पादन केले जाईल.
जुन्या विमानांची जागा घेण्यासाठी भारतीय हवाई दलास शेकडो नवी लढाऊ विमाने घ्यावी लागणार आहेत. लॉकहीड मार्टिन कंपनीसही ही अब्जावधी डॉलरची ‘ऑर्डर’ मिळविणे गरजेचे होते. परंतु मोदी सरकारने लष्करी साहित्याची परदेशातून तयार स्वरूपात खरेदी न करता त्या उत्पादकांना त्यांच्या मालाचे उत्पादन भारतात करण्याची अट घातली. देशाची गरज भागावी व त्याचसोबत नवे तंत्रज्ञान देशात येऊन स्थानिक उद्योगांचा बळकटी मिळावी हा यामागचा उद्देश होता.