नवी दिल्ली : गेल्या सात महिन्यांपासून कृषी कायद्याच्या विरोधात गाझीपूर सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. बुधवारी या आंदोलनाच्या ठिकाणी भाजपचे कार्यकर्ते पोहचल्याने आंदोलनाला हिंसक वळण मिळाले. यात दोन्ही बाजूने एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यात आलेत. सकाळी गाझीपूर सीमेवर भाजप कार्यकर्ते दाखल झाले. शेतकरी आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये वाद झाल्याने मारहाण झाली. गोंधळाची बातमी मिळताच प्रचंड पोलीस दल घटनास्थळी पोहोचले. या घटनेत शेतकऱ्यांकडून भाजप कार्यकर्त्याची गाडी फोडण्यात आली आहे. या घटनेनंतर भाजपने गाझियाबाद पोलीस अधीक्षक कार्यालयाला घेरावा घातला.
भाजपचे नवनियुक्त प्रदेश मंत्री अमित वाल्मिकी यांच्या स्वागतासाठी दिल्ली-मेरठ एक्स्प्रेसवेवर कार्यकर्ते उभे होते. कार्यकर्त्यांच्या वाहनांचा ताफा शेतकरी व्यासपीठासमोर पोहोचला तेव्हा शेतकरी आणि भाजपमध्ये चकमक सुरू झाली. या कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांना शिवीगाळ केल्याचा आरोप टिकैत यांनी केला आहे. त्यानंतर शेतकऱ्यांनीही भाजप कार्यकर्त्यांविरोधात घोषणाबाजी केली.
'भाकियू'च्या वतीने पोलिसांकडे तक्रार नोंदवली आहे. 'भाकियू'चे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत म्हणाले की, भाजप कार्यकर्त्यांना या मंचावर कब्जा करायचा आहे. हे लोक गेल्या अनेक दिवसांपासून येथे येत आहेत आणि वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करीत आहेत.