नवी दिल्ली : कोरोनामुळे उद्भवलेली परिस्थिती आणि ई-फायलिंग करताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी या कारणांमुळे विहित मुदतीत इन्कम टॅक्स रिटर्न भरू न शकणाऱ्या करदात्यांना केंद्र सरकारने दिलासा दिला आहे. रिटर्न भरण्याची मुदत आता १५ मार्चपर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यासंदर्भातील घोषणा केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) मंगळवारी केली.
इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची मुदत तिसऱ्यांदा वाढविली आहे. हे विशेष. दरम्यान, उद्योगांनाही त्यांचे ऑडिट रिपोर्ट भरण्यासाठीची मुदत १५ फेब्रुवारीपर्यंत वाढवून देण्यात आली आहे. २०२०-२१ या आर्थिक वर्षासाठी रिटर्न भरण्याची अंतिम मुदत ३१ डिसेंबरपर्यंत होती. त्यानंतर रिटर्न दाखल केल्यास एक ते पाच हजार रुपयापर्यंतचे विलंब शुल्क आकारण्यात येणार होते. मात्र, देशभरातील असंख्य करदाते, सनदी लेखापाल आणि व्यावसायिकांनी कोरोनाचा आपत्काळ आणि इन्कम टॅक्स पोर्टलवर ई-फायलिंग करताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी या पार्श्वभूमीवर इन्कम टॅक्स रिटर्न दाखल करण्याची मुदत वाढवून देण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली होती.