नवी दिल्ली - कर्तव्यात कसूर करणाऱ्या, कामचुकारपणा, दिरंगाई करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची शासन प्रशासनामध्ये कमतरता नाही. आता अशाच एका कामचुकार अधिकाऱ्याला दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी दणका दिला आहे. मनीष सिसोदिया यांनी मंगळवारी उत्तर-पश्चिम दिल्लीतील कामगार कार्यालयाला अचानक भेट दिली. यावेळी बांधकाम कामगारांच्या नोंदणीमध्ये अनियमितता दिसून आली. त्यामुळे सिसोदिया यांनी कार्यालयाच्या व्यवस्थापकाची तडकाफडकी हकालपट्टी केली.बांधकाम कामगारांच्या नोंदणीमध्ये अनियमितता असल्याच्या तक्रारी मिळाल्यानंतर सिसोदिया यांनी या कार्यालयाला अचानक भेट दिली. य भेटीवेळी केलेल्या निरीक्षणात डझनभर प्रकरणांमध्ये अनियमितता दिसून आली. मिळालेल्या माहितीनुसार उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी संबंधित अधिकाऱ्याला तत्काळ बरखास्त केले. नोंदणीदरम्यान प्रक्रियेचे उल्लंघन करण्यापासून ते कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडून महिलेऐवजी पुरुषाचे फोटो लावण्यासारख्या चुका होत असल्याच्या तक्रारी दिसून आल्या.