मध्य प्रदेश निवडणुकीसाठी काँग्रेस, भाजप उमेदवारांची अंतिम यादी जाहीर, मुख्यमंत्री चौहानांविरुद्ध अरुण यादव मैदानात
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2018 03:25 AM2018-11-09T03:25:28+5:302018-11-09T03:25:54+5:30
काँग्रेसने मध्य प्रदेशमध्ये २८ नोव्हेबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी गुरुवारी रात्री उमेदवारांची सहावी व शेवटची यादी जाहीर केली.
भोपाळ : काँग्रेसने मध्य प्रदेशमध्ये २८ नोव्हेबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी गुरुवारी रात्री उमेदवारांची सहावी व शेवटची यादी जाहीर केली. या यादीत पक्षाचे वरीष्ठ नेते अरुण यादव यांच्या नावाचा समावेश आहे. ते मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांच्या विरुद्ध बुधनीमधून निवडणूक लढविणार आहेत. भाजपनेसुद्धा ७ उमेदवारांचा समावेश असलेली शेवटची यादी जाहीर केली आहे. काँग्रेसने जताराची जागा मित्रपक्ष लोकतांत्रित जनता दलसाठी (एलजेडी) सोडलेली आहे. मुख्यमंत्री चव्हान विरुद्ध अरुण यादव शुक्रवारी नामांकन अर्ज दाखल करणार आहेत.
काँग्रेसने अनुसुचित जातीसाठी राखीव असलेली जतारा येथील जागा एलजेडीसाठी सोडलेली आहे. एलजेडी येथे विक्रम चौधरी यांना निवणूक रिंंगणात उतरविण्याची शक्यता आहे.
आम्ही २३० पैकी २२९ उमेदवारांची यादी जाहीर केली असल्याचे मध्य प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ता पंकज चतुर्वेदी यांनी स्पष्ट केले.
भोपाळवरुन ६० किलोमीटर अंतरावर असलेल्या बुधनी हे चौहाण यांचा गृहमतदार संघ असल्याचे मानल्या जाते. ते १९९० मध्ये येथून पहिल्यांदा विधानसभेची निवडणूक जिंकले होते. या मतदार संघातून ते पाचव्यांदा निवडणूक लढवित आहेत. २०१३ मध्ये चौहाण यांनी बुधनी मतदार संघातून काँग्रेसच्या महेंद्रसिंग चौहाण यांचा ८४००० मतांनी पराभव केला होता.
यादव यांच्या व्यतिरिक्त काँग्रेसच्या आज जाहीर झालेल्या अंतिम यादीत इंदूर-१ (संजय शुक्ला), इंदूर -२(मोहन सिंग सेंगर), इंदूर -५(सत्यनारायण पटेल), मानपूर-एसटी(ग्यानवती सिंग) आणि रतलाम ग्रामिण-एसटी(थवरलाल भुरिया) यांचा समावेश आहे.
भाजपच्या अंतिम यादीत उत्तर भोपाळ मतदार संघातून काँग्रेसचे विद्यमान आमदार अरिफ अकील यांच्या विरुद्ध महिला उमेदवार फतिमा रसूल सिद्दिकी यांची उमेदवारी जाहीर केली आहे. अन्य जागांसाठी पवई (प्रल्हाद लोधी), पन्ना (ब्रिजेद्रा सिंग), लखनडोन -एसटी( विजय उईके), सिवनी-मालवा (प्रेम शंकर वर्मा) , महिदपूर (बहादूर सिंग चौहाण) आणि गॅरोथ (देविलाल धाकर) यांचा समावेश आहे. भाजपने राज्यातील २३० जागांसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली असल्याचे पक्षाचे प्रवक्ता सर्वेश तिवारी यांनी स्पष्ट केले.
सरताज सिंह यांचा भाजपला रामराम
पक्षाने उमेदवारी नाकारल्याने भाजपाचे वरिष्ठ नेते सरताज सिंह यांनी पक्षाला रामराम ठोकत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेसने त्यांना होशंगाबाद मतदार संघातून मैदानात उतरविले आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर सरताज सिंह यांचा भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे. विशेष म्हणजे, सरताज सिंह पाच वेळा खासदार होते.