गुवाहाटी : वैध नागरिकांची आसाममधील नॅशनल रजिस्टर फॉर सिटिझनशिपची (एनआरसी) अंतिम यादी आज प्रसिद्ध होणार आहे. यापार्श्वभूमीवर लोकांनी अजिबात घाबरून जाऊ नये, असे आवाहन आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी केले आहे. जे मूळ भारतीय आहेत त्यांना नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी सर्व प्रकारचे सहाय्य करण्यात येईल, गरिबांना सरकारतर्फे कायदेशीर मदत पुरविली जाईल असेही सर्वानंद सोनोवाल सांगितले आहे.
याचबरोबर, एनआरसीमधून एखाद्याचे नाव वगळले गेले म्हणजे ती व्यक्ती काही लगेच विदेशी नागरिक ठरणार नाही. फॉरिनर ट्रायब्युनलच्या पुढे या प्रकरणाची सुनावणी होऊन मगच त्याच्या नागरिकत्वाबद्दल अंतिम निर्णय घेतला जाईल, असेही सर्वानंद सोनोवाल यांनी म्हटले आहे.
मुस्लिमांंमध्ये भीतीएनआरसीची अंतिम यादी शनिवारी प्रसिद्ध होत असल्याने आसाममध्ये सुरक्षाव्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. अंतिम यादीतून आसाममधील ४१ लाख लोकांची नावे वगळण्यात आली आहेत. त्यामुळे आपण विदेशी नागरिक ठरू अशी भीती असंख्य लोकांना विशेषत: मुस्लिमांना वाटत आहे.
या यादीमध्ये अनेकांची नावे चुकीच्या पद्धतीने समाविष्ट करण्यात आली आहेत. त्यामुळे नागरिकांवर अन्याय होऊन प्रसंगी घुसखोरांनाही या यादीत स्थान मिळू शकते अशी भीती भाजप, काँग्रेस, आॅल इंडिया डेमोक्रॅटिक फ्रंट आदी पक्षांनी व्यक्त केली आहे. या प्रक्रियेला आॅल आसाम स्टुडंटस् युनियनने पाठिंबा दिला आहे.