राहुल गांधींच्या याचिकेवर अंतिम आदेश सुट्टीनंतरच; अंतरिम दिलासा देण्यास नकार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2023 06:28 AM2023-05-03T06:28:14+5:302023-05-03T06:28:37+5:30
सर्व तपशील आणि कार्यवाहीचा अधिकृत अहवाल पाहिल्यानंतरच उन्हाळी सुटीनंतर अंतिम आदेश देऊ असं न्यायाधीशांनी म्हटलं
अहमदाबाद : गुजरात उच्च न्यायालयाने मंगळवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना त्यांच्या ‘मोदी आडनाव’ टिप्पणीशी संबंधित गुन्हेगारी बदनामी प्रकरणात दोषी ठरविल्याबद्दल अंतरिम दिलासा देण्यास नकार दिला आणि उन्हाळी सुटीनंतर अंतिम आदेश दिला जाईल, असे सांगितले.
ज्येष्ठ वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी राहुल गांधी यांची बाजू मांडली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर या प्रकरणात तातडीचा म्हणून अंतरिम किंवा अंतिम आदेश देण्याची विनंती त्यांनी न्यायालयाला केली. त्यावर न्यायमूर्ती हेमंत प्रच्छक म्हणाले की, या टप्प्यावर अंतरिम संरक्षण दिले जाऊ शकत नाही. सर्व तपशील आणि कार्यवाहीचा अधिकृत अहवाल पाहिल्यानंतरच उन्हाळी सुटीनंतर अंतिम आदेश देऊ.
गुजरात उच्च न्यायालयात ८ मे ते ३ जून या कालावधीत उन्हाळी सुट्या आहेत. गुजरातमधील भाजप आमदार आणि या प्रकरणातील मूळ तक्रारदार पूर्णेश मोदी यांच्या बाजूने उपस्थित असलेले वकील निरूपम नानावटी यांनी गांधींना अंतरिम दिलासा देण्याच्या सिंघवी यांच्या याचिकेला कडाडून विरोध केला.