- डिप्पी वांकाणी, मुंबईअंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) ‘युनायटेड स्पिरीट’चे माजी चेअरमन विजय मल्ल्या यांना शनिवारी तिसरे आणि शेवटचे समन्स पाठवून ९ एप्रिलपर्यंत चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे. मल्ल्या यांना पाठविलेले हे शेवटचे समन्स आहे. ते ९ एप्रिलपर्यंत हजर न झाल्यास त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे, असे ईडीच्या सूत्रांनी सांगितले. मल्ल्यांना यापूर्वी दोन वेळा समन्स बजावण्यात आले होते. दुसऱ्या समन्समध्ये त्यांना २ एप्रिल रोजी ‘ईडी’च्या दक्षिण मुंबईतील कार्यालयात हजर होण्यास सांगण्यात आले होते. मात्र, ते आलेच नाहीत. त्यांनी हजर होण्याची मुदत वाढवून द्यावी, अशी लेखी मागणी शुक्रवारी ईडीकडे केली. ‘आपण आपल्या कर्जपुरवठादारांना चार हजार कोटी रुपयांच्या परतफेडीचा प्रस्ताव दिला असून सर्वोच्च न्यायालयात ७ एप्रिल रोजी त्याबाबत सुनावणी होणार आहे. त्यामुळे हजर होण्याची मुदत मे महिन्यापर्यंत वाढवावी,’ असे मल्ल्यांनी म्हटले असल्याचे समजते.‘आम्ही त्यांना पाठविलेले हे शेवटचे समन्स आहे. आम्ही हजर होण्याची मुदत मेपर्यंत वाढवून देऊच शकत नाही. या वेळी ते हजर झाले नाहीत, तर आम्ही न्यायालयाला त्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र अटक वॉरंट जारी करण्याची विनंती करू’, असे ईडीच्या अधिकाऱ्याने स्पष्ट केले. मल्ल्या आलेच नाहीत तर त्यांना आणण्याचे इतरही पर्याय उपलब्ध आहेत. भारताचा ब्रिटनसोबत १९९३ पासून प्रत्यार्पण करार आहे. त्यामुळे परराष्ट्र मंत्रालयामार्फत प्रत्यार्पण प्रक्रिया सुरू करता येऊ शकते.
विजय मल्ल्यांना अखेरचे समन्स
By admin | Published: April 03, 2016 3:50 AM