हरीश गुप्ता, नवी दिल्लीपठाणकोट येथील दहशतवादी हल्ल्याच्या संदर्भात करण्यात आलेल्या प्रदीर्घ चौकशीदरम्यान पंजाबमधील पोलीस अधीक्षक सलविंदरसिंग यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह असे काहीही आढळून न आल्याने राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) आणि पंजाब पोलिसांनी आता सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.केंद्रीय गृहमंत्रालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सलविंदरसिंग यांचा सीमेपलीकडील मादक पदार्र्थाची तस्करी करणाऱ्यांशी काही संबंध असल्याचे किंवा ते एखाद्या गुन्हेगारी कारवांमध्ये सामील असल्याचे त्यांच्यावरील लाय डिटेक्टर टेस्ट मधून निष्पन्न झाले नाही. एनआयएने अनेक दिवसपर्यंत कसून चौकशी केल्यानंतर सलविंदरसिंग यांची लाय डिटेक्टर टेस्ट घेतली होती. या लाय डिटेक्टर टेस्टमध्ये काहीही आक्षेपार्ह आढळले नाही. चार दहशतवाद्यांनी १ जानेवारी रोजी आपले आणि आपल्या जीपमध्ये बसलेल्यांचे अपहरण केले होते आणि नंतर जंगलात फेकून दिले होते, असे सलविंदरसिंग यांनी म्हटले होते. त्यांचे हे म्हणणे खरे आहे किंवा काय याची शहानिशा करण्याचा एनआयएचा प्रयत्न होता. प्रारंभी सलविंदरसिंग यांच्या म्हणण्यात अनेक विसंगती आढळून आल्या. त्यामुळे एनआयएने त्यांना दिल्लीत आणले आणि सखोल चौकशी केली.यापुढे एनआयए सलविंदरसिंग यांच्या मित्रांची चौकशी सुरूच ठेवणार असली तरी सलविंदरसिंग यांचा दहशतवादी वा तस्करांशी कसलाही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष संबंध नाही हे आता स्पष्ट झाले आहे.> बेंगळुरु: येथील फ्रान्सच्या महावाणिज्य दूतावासास राष्ट्राध्यक्ष फ्रांस्वा ओलाँद यांच्या भारत दौऱ्याविरुद्ध धमकीचे पत्र प्राप्त झाले आहे. ११ जानेवारीला मिळालेले तीन ओळींचे हे पत्र मोडक्यातोडक्या इंग्रजीत लिहिले आहे. परंतु नेमके काय करण्याची धमकी आहे ते यातून स्पष्ट होत नाही. ओलाँंद यांनी भारतात येऊ नये,असे त्यात नमूद आहे. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष येत्या २६ जानेवारीला नवी दिल्लीत होणाऱ्या गणराज्य दिन समारंभाचे प्रमुख पाहुणे आहेत.> इटारसी (मध्य प्रदेश): न्यायालयातील सुनावणीसाठी तामिळनाडूमधून लखनौला नेण्यात येत असलेल्या सय्यद अली नावाच्या दहशतवाद्याने राप्तीसागर सुपर फास्ट एक्स्प्रेसमधून उडी घेऊन पळ काढला. अलीने उत्तर प्रदेशात ताजमहाल आणि एक दर्गा तसेच वेल्लोरमधील ख्रिश्चन मेडिकल कॉलेज उडविण्याची धमकी दिली होती.
सलविंदरसिंग यांना अखेर क्लीन चिट
By admin | Published: January 22, 2016 2:46 AM