अखेर मृत्यू हरला... जिद्द जिंकली, १७ दिवसांनंतर ४१ कामगारांनी पाहिले जीवन; देशातील पहिलीच घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2023 07:21 AM2023-11-29T07:21:53+5:302023-11-29T07:22:26+5:30

uttarkashi tunnel accident: एनडीआरएफ आणि अन्य बचावपथकांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर तब्बल १७ दिवसांपासून बाहेरचे जग पाहण्यासाठी आसुसलेल्या कामगारांना सुखरूप बाहेर काढण्यास सुरुवात झाली. एक-एक कामगार बाहेर येताच 'भारत माता की जय'चा जयघोष झाला.

Finally death lost... determination won, 41 workers saw life after 17 days; The first incident in the country | अखेर मृत्यू हरला... जिद्द जिंकली, १७ दिवसांनंतर ४१ कामगारांनी पाहिले जीवन; देशातील पहिलीच घटना

अखेर मृत्यू हरला... जिद्द जिंकली, १७ दिवसांनंतर ४१ कामगारांनी पाहिले जीवन; देशातील पहिलीच घटना

उत्तरकाशी : तारीख होती १२ नोव्हेंबर २०२३, वेळ होती पहाटे साडेपाच वाजण्याची... सिल्क्यारा बोगद्यात अचानक वरचा भाग कोसळला आणि ४१ कामगार जीवन-मरणाच्या संकटात अडकले आणि सुरू झाला त्यांच्या सुटकेचा थरार... डोंगराएवढे आव्हान समोर असतानाही रात्रंदिवस विविध यंत्रणांना लढत होत्या. त्यांच्या प्रयत्नांना वेगवेगळे आव्हाने अडथळा निर्माण करत होते, मात्र त्या ४१ जणांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी जिद्दीने पेटलेले बचावपथक त्यावरही मात देत होते. 

मागील १७ दिवसांपासून बोगद्यात अडकलेल्या कामगारांची आज होईल, उद्या होईल, अशी सुटकेची प्रतीक्षा सुरू होती. मात्र येणारा प्रत्येक दिवस हा आशा-निराशेच्या हिंदोळ्यावर झुलत होता. अगदी काही तासांमध्ये सुटका होईल, अशी परिस्थिती असताना, अचानक नवे आव्हान समोर उभे ठाकले जात होते. कधी मलबा काढण्यात अडथळे येत होते, तर कधी ऑगर मशिन तुटत होती, मात्र बचावपथकाची जिद्द काही कमी नव्हती. पर्याय म्हणून डोंगराच्या वरून उभ्याने खोदकाम करण्यात आले. काही मीटरपर्यंत खोदत येणार तोच रॅट मायनर्स म्हणून ओळखले जाणारे खास पथक मोहिमेत दाखल झाले आणि कामगारांच्या सुटकेचा क्षण दृष्टिपथात आला. त्यांनी उर्वरित मोहीम पूर्ण केली. 

एनडीआरएफ आणि अन्य बचावपथकांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर तब्बल १७ दिवसांपासून बाहेरचे जग पाहण्यासाठी आसुसलेल्या कामगारांना सुखरूप बाहेर काढण्यास सुरुवात झाली. एक-एक कामगार बाहेर येताच 'भारत माता की जय'चा जयघोष झाला. बघता बघता काही वेळात सर्व कामगार सुरक्षित बाहेर आले आणि संपूर्ण देशभरात जणू पुन्हा दिवाळी साजरी झाली.

‘संयम आणि साहसाचे काैतुक करावे तेवढे कमी’
उत्तरकाशीमध्ये आपल्या कामगारबंधुंच्या बचाव माेहिमेचे यश प्रत्येकाला भावूक करणारे आहे. बाेगद्यांमध्ये जे सहकारी फसले हाेते, त्यांना मी सांगू इच्छिताे की, तुमचे साहस आणि धैर्य प्रत्येकाला प्रेरित करत आहे. एवढ्या दीर्घकाळ प्रतीक्षेनंतर आपले हे सर्व सहकारी त्यांच्या कुटुंबियांना भेटणार आहेत, ही अत्यंत समाधानाची बाब आहे. त्यांच्या कुटुंबियांनी अशा आव्हानात्मक समयी संयम आणि साहस दाखविले, त्याचे काैतुक करावे तेवढे कमी आहे. मी या बचाव माेहिमेत सहभागी असलेल्या सर्व लाेकांच्या भावनेला सलाम करताे. - नरेंद्र माेदी, पंतप्रधान.

बचाव मोहीम यशस्वी करणाऱ्यांना देश करतोय सलाम
सिलक्यारा बोगद्यात अडकलेल्या सर्व कामगारांची सुटका करण्यात यश आले ही दिलासा व आनंद देणारी घटना आहे. गेल्या १७ दिवसांपासून अडकलेल्या या कामगारांच्या सुटकेसाठी अथक प्रयत्न सुरू होते. या बचावकार्यात अनेक अडथळे आले. या साऱ्या अडथळ्यांवर मात करून तसेच स्वत:चा जीव धोक्यात घालून ज्यांनी ही मोहीम यशस्वी केली त्यांना सारा देश सलाम करत आहे. जगातील सर्वांत कठीण बचाव मोहिमांपैकी एक असलेल्या या मोहिमेत सहभागी झालेले विविध दलांचे जवान तसेच तज्ज्ञ यांचे मी अभिनंदन करते.    - द्रौपदी मुर्मू, राष्ट्रपती

शेवटी देवाने ऐकले... कामगारांच्या कुटुंबीयांनी सोडला सुटकेचा नि:श्वास
ओरमांझी : उत्तराखंडमधील सिल्क्यरा बोगद्यात अडकलेल्या खिराबेडा येथील तीन मजुरांच्या कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद फुलला, जेव्हा त्यांच्या सुटकेची बातमी मंगळवारी संध्याकाळी या गावात पोहोचली.
अर्धांगवायू झालेला श्रावण बेदिया (५५) यांचा एकुलता एक मुलगा राजेंद्र बोगद्यात अडकला होता. सुटकेची बातमी आली तेव्ही ते त्यांच्या झोपडीबाहेर व्हिलचेअरवर बसले होते. बातमी कळताच त्यांच्या चेहऱ्यावर दिलासा दिसला. २२ वर्षीय राजेंद्र व्यतिरिक्त, गावातील २० वर्षीय सुखराम आणि अनिलही १७ दिवस बोगद्यात अडकले होते. अनिलचा भाऊ सुनील, जो उत्तरकाशीच्या बोगद्याच्या बाहेर तळ ठोकून होता. त्याने अत्यंत भावुक होत ‘शेवटी देवाने आमचे ऐकले. माझ्या भावाची सुटका होऊ शकली. रुग्णालयात जाताना मी रुग्णवाहिकेत त्याच्यासोबत आहे,’ अशी भावना व्यक्त केली. 

ऑपरेशनचा हिरो.. अरनॉल्ड डिक्स
ऑस्ट्रेलियाचे मायक्रोटनलिंग तज्ज्ञ अरनॉल्ड डिक्स यांना भारत सरकारने सल्लागार म्हणून बचाव कार्यात सामील होण्यासाठी आमंत्रित केले होते. त्यानंतर त्यांनी अनेक दिवस आणि रात्र बोगद्याच्या बाहेर बचाव कर्मचाऱ्यांसोबत घालवली. सिलक्यारा बोगद्यातील बचाव ऑपरेशन आतापर्यंतचे ‘सर्वात कठीण’ ऑपरेशन आहे. केवळ तांत्रिक कारणांसाठी हे सर्वात कठीण (ऑपरेशन) आहे, असे नाही तर यात मोठा धोका आहे. आतील प्रत्येकजण सुरक्षितपणे बाहेर पडेल, याची खात्री करण्यासाठी हे ऑपरेशन आहे.

१२ रॅट-माइनर्स आत गेले अन्  डोंगर पराभूत झाला 
शक्तिशाली ऑगर ड्रिलिंग मशीन शुक्रवारी ढिगाऱ्यात अडकल्याने अधिकाऱ्यांनी शेवटच्या १० मीटरचा ढिगारा खोदण्यासाठी हाताने बोरिंग करण्याची योजना आखली होती. मर्यादित जागेत हाताने पकडलेल्या साधनांचा वापर करून ड्रिलिंगचा शेवटचा भाग पूर्ण करण्यासाठी १२ रॅट-माइनर्स बोलावण्यात आले होते. त्यांनी चोख कामगिरी बजावली. त्यांचे कौशल्य आणि अनुभव कामी आला, त्यांनी २४ तासांपेक्षा कमी वेळेत १० मीटर खोदून एक अभूतपूर्व काम केले. रॅट-होल खाणकाम बेकायदेशीर असू शकते; परंतु या तज्ज्ञांची प्रतिभा आणि अनुभव यांचा योग्य वापर येथे केला गेला, असे हसनैन यांनी सांगितले. ते दिल्ली, झाशी आणि देशाच्या इतर भागातून आले होते.

जगाने पाहिले.. जबरदस्त नियोजन
nकामगारांना बाहेर काढल्यानंतर त्यांना तत्काळ वैद्यकीय सेवा देण्यासाठी बोगद्याच्या आत आठ खाटांचे तात्पुरते आरोग्य केंद्र उभारण्यात आले होते.
nसुटका करण्यात आलेल्या कामगारांसाठी सिल्क्यरापासून ३० किमी अंतरावर असलेल्या चिन्यालिसौर येथील सामुदायिक आरोग्य केंद्रात काही दिवसांपूर्वी ऑक्सिजनची व्यवस्था असलेल्या ४१ बेडसह एक विशेष वॉर्ड तयार करण्यात आला होता. डॉक्टरही सज्ज होते. गरज पडल्यास मजुरांना अधिक प्रगत रुग्णालयात नेण्याची व्यवस्था केलेली होती.
nघटनास्थळी प्राथमिक तपासणीनंतर सुटका झालेल्या कामगारांना सुमारे ३० किलोमीटर दूर असलेल्या सामुदायिक आरोग्य केंद्रात नेण्यासाठी रुग्णवाहिका बोगद्याच्या तोंडावर रांगेत उभ्या होत्या.
nरुग्णवाहिकांचा मार्ग सुकर व्हावा यासाठी मातीचा थर पुन्हा टाकण्यात आला. बोगद्याच्या आत स्ट्रेचर नेले जात होते.

Web Title: Finally death lost... determination won, 41 workers saw life after 17 days; The first incident in the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.