नवी दिल्ली - मणिपूरच्या घटनेवरून संसदेत सुरु असलेल्या गोंधळात आता विरोधी पक्षाच्या आघाडीने मोदी सरकारविरोधात लोकसभेत अविश्वास प्रस्ताव आणण्याची तयारी केली होती. अखेर, विरोधकांच्यावतीने केंद्रातील भाजप सरकारविरुद्ध अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे. काँग्रेसखासदार गौरव गोगई यांनी आज लोकसभेत सरकारविरुद्ध अविश्वास प्रस्ताव दाखल केला. त्यामुळे, लोकसभा सभापतींनी प्रस्ताव स्वीकारुन आदेश दिले. तर, मोदी सरकारला लोकसभेत बहुमत सिद्ध करावं लागू शकते. दरम्यान, केवळ जिंकण्यासाठीच हा प्रस्ताव आणला जात नसून सरकारच्या हुकूमशाहीविरुद्ध हा आवाज उठवण्यात आल्याचंही काँग्रेसने यावेळी म्हटलंय.
अविश्वास प्रस्ताव आणल्यामुळे सरकारला मणिपूरच्या घटनेवर दीर्घ चर्चेला भाग पाडले जाईल आणि त्यादरम्यान पंतप्रधानांना जबाबदार धरले जाईल असं INDIA आघाडीच्या नेत्यांना वाटते. विरोधी पक्षाच्या आघाडीतील नेत्यांनी या अविश्वास प्रस्तावाला सहमती दिली आहे. कमीत कमी ५० खासदारांच्या स्वाक्षरीचे अभियान यापूर्वीच सुरूही झाले होते. आज लोकसभेत मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणू असं काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी म्हटलं होतं. त्यानुसार, खासदार गौरव गोगई यांनी लोकसभेत अविश्वास प्रस्ताव मांडला. तसेच, बीआरएस खासदार नमा नागेश्वर यांनीही केंद्र सरकारविरुद्ध अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे. त्यामुळे, गरजेच्या संख्याबळानुसार खासदारांच्या सह्या झाल्यानंतर लोकसभा सभापतींकडून तो प्रस्ताव दाखल करुन घेतला जाईल. त्यानंतर, सभापतींनी निर्देश दिल्यानंतरच मोदी सरकारला बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. त्यामुळे, बहुमत सिद्ध करण्याची वेळ सरकारवर येऊ शकते.
अधी रंजन चौधरी म्हणाले
अधीर रंजन चौधरी म्हणाले की, सरकारवर लोकांचा विश्वास उठला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मणिपूर घटनेवर बोलावे अशी आमची मागणी आहे. परंतु पंतप्रधान कुणाचे ऐकत नाहीत. ते सभागृहाच्या बाहेर बोलतात आणि सभागृहात नकार देतात. पंतप्रधानांनी आमच्याकडे लक्ष द्यावे यासाठी आम्ही प्रयत्न केले मात्र त्यात यश आले नाही त्यामुळे आम्हाला अविश्वास प्रस्ताव आणणे योग्य वाटतेय, असं त्यांनी सांगितलं.
म्हणून आणला अविश्वास प्रस्ताव
अविश्वास प्रस्ताव प्रत्येक वेळी जिंकण्यासाठी आणला जात नाही. कशाप्रकारे देशात हुकुमशाही सरकार चालतंय आणि विरोधी पक्षांना अपमानित केले जातेय हे जनतेला कळायला हवे. आम्हाला अविश्वास प्रस्ताव आणण्याची वेळ का आली हा खरा प्रश्न आहे असेही काँग्रेसने म्हटलं आहे. तर भाजपा नेते धर्मेंद्र प्रधान यांनी काँग्रेसवर पलटवार केला. ज्या विरोधकांनी देशातील जनतेचा विश्वास गमावला आहे त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्याविरोधात कितीही अविश्वास प्रस्ताव आणण्याचा विचार केला तरी काही बदलणार नाही. जनतेने वारंवार नाकारल्याने स्वत:वरील विश्वास गमावला आहे. त्यामुळे INDIA नाव ठेवल्याने जनतेचा विश्वास मिळाला असता तर ईस्ट इंडिया कंपनी कधी पळाली नसती असंही प्रधान यांनी म्हटलं.