D. K. Shivakumar: मुख्यमंत्री न बनू शकल्याच्या मुद्द्यावर अखेर डी. के. शिवकुमार यांनी सोडलं मौन, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2023 11:29 PM2023-06-03T23:29:05+5:302023-06-03T23:29:55+5:30
D. K. Shivakumar: मुख्यमंत्रिपदाने हुलकावणी दिल्याची सल शिवकुमार यांनी पुन्हा एकदा बोलून दाखवली आहे.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला ऐतिहासिक विजय मिळाल्यानंतर डी.के. शिवकुमार आणि सिद्धारमैय्या यांच्या मुख्यमंत्रिपदासाठी रस्सीखेच झाली. यामध्ये अखेर सिद्धारमैय्या यांनी बाजी मारली होती. दरम्यान, मुख्यमंत्रिपदाने हुलकावणी दिल्याची सल शिवकुमार यांनी पुन्हा एकदा बोलून दाखवली आहे. गांधी कुटुंबीय आणि राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या सल्ल्यानंतर मी मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीतून बाहेर पडलो आणि संयम पाळण्याचा निर्णय घेतला.
उपमुख्यमंत्री बनल्यानंतर आपल्या मतदारसंघाच्या दौऱ्यावर गेलेल्या शिवकुमार यांनी मतदारांना सांगितले की, मला मुख्यमंत्री म्हणून पाहण्याची तुमची इच्छा कधी खोटी ठरणार नाही. तुम्ही केवळ संयम पाळा. तुम्ही मला मुख्यमंत्री बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मतदान केलं होतं. मात्र काय करणार एक निर्णय झाला. राहुल गांधी, सोनिया गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे यांनी मला एक सल्ला दिला. आता मला मोठ्यांच्या म्हणण्याचा मान ठेवायचाच होता. मला संयम पाळावा लागेल.
मात्र मी तुम्हाला सांगू इच्छितो की, मला मुख्यमंत्री म्हणून पाहण्याची तुमची इच्छा कधीही खोटी ठरणार नाही. संयम पाळा. हल्लीच झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने २२४ पैकी १३५ जागा जिंकून दणदणीत विजय मिळवला होता. त्यानंतर पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार सिद्धारमैय्या हे मुख्यमंत्री तर डी.के. शिवकुमार हे उपमुख्यमंत्री बनले होते.