नवी दिल्ली - पाकिस्तानी कारागृहात बंद असलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांच्या आई आणि पत्नीला पाकिस्तानने अखेर व्हिसा जारी केला आहे. त्यामुळे मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आलेल्या कुलभूषण जाधव यांची भेट घेण्यासाठी जाण्याचा कुटुंबीयांचा मार्ग मोकळा झाला आहे.
देहदंडाची शिक्षा सुनावले गेलेले कुलभूषण जाधव यांना त्यांची पत्नी आणि आई २५ डिसेंबर रोजी भेटू शकतील. या दोघींना जाधव यांना भेटू दिले जाईल, अशी माहिती पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते मोहम्मद फैसल यांनी काही दिवसांपूर्वी दिली होती. जाधव यांच्या आईला व्हिसा द्यावा, अशी विनंती भारताने काही महिन्यांपूर्वी पाकिस्तानकडे केली होती.
हेरगिरी व दहशतवादाच्या आरोपावरून जाधव यांना पाकच्या लष्करी न्यायालयाने देहदंडाची शिक्षा सुनावली. आंतरराष्ट्रीय न्यायालयाने भारताच्या अपिलावरून मे महिन्यात शिक्षेला स्थगिती दिली होती. त्यामुळे जगभरात पाकिस्तानची चांगलीच नाचक्की झाली होती. मात्र आता पाकने व्हिसा जारी केल्याने जाधव व त्यांच्या कुटुंबीयांची भेट होईल.
स्वराज यांचा पाठपुरावायापूर्वी पाकने जाधव यांच्या पत्नीला पतीला भेटण्यास १० नोव्हेंबर रोजी परवानगी दिली होती. जाधव यांच्या मातोश्री अवंतिका यांना मुलाला भेटण्यासाठी मानवतेच्या दृष्टीकोनातून व्हिसा द्यावा यासाठी भारताने सातत्याने पाठपुरावा केला होता. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी याच प्रश्नावर पाकिस्तानचे भारतातील उच्चायुक्त सोहेल महमूद यांच्याशी नुकतीच चर्चा केली होती.
कुलभूषण जाधव हे नौदलाचे माजी अधिकारी असून, निवृत्तीनंतर व्यावसायिक कामासाठी ते इराणला गेले असता, तिथे त्यांना पाकिस्तानने अटक केली. ते भारतासाठी हेरगिरी करीत असून, त्यांना ३ मार्च रोजी बलुचिस्तानमध्ये अटक करण्यात आली, असा दावा पाकिस्तानने केला. त्यांच्या फाशीला भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात आव्हान दिले असून, १३ डिसेंबर रोजी पाकिस्तानने आपले म्हणणे सादर करावे, असे आंतरराष्ट्रीय न्यायालयाने सांगितले आहे.