नवी दिल्ली - राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा, माजी केंद्रीय मंत्री आणि देशाच्या राजकारणातील मुरब्बी नेते शरद पवार यांना पाचव्या रांगेचा पास दिला गेल्यानं ते शपथविधी सोहळ्याला गेले नाहीत, असा दावा करण्यात येत होता. मोदी सरकारने पवारांचा अपमान केला, महाराष्ट्राचा अवमान केला, अशा प्रतिक्रियाही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सोशल मीडियावर व्यक्त करत होते. परंतु, या दाव्यात काही तथ्य नसल्याचं राष्ट्रपती भवनकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. राष्ट्रपती भवनचे माध्यम सचिव अशोक मलिक यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. दरम्यान, लोकमत वृत्त समुहाने यासंदर्भात मंगळवारीच बातमी दिली होती.
शरद पवार हे 30 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याला अनुपस्थित राहिले होते. राजधानी दिल्लीत जाऊनही त्यांनी शपथविधी सोहळ्याकडे पाठ फिरवल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. तेव्हा, शरद पवार यांना राष्ट्रपती भवनाकडून पाठवण्यात आलेला पास V रांगेचा होता. हा V म्हणजे रोमनमधील पाच असल्याचा पवारांचा समज झाला असावा किंवा नंतर तसं वातावरण निर्माण करण्यात आलं असावं. पण, पवारांना देण्यात आलेला V पास म्हणजे VVIP मधील V होता, असे राष्ट्रपती भवनचे माध्यम सचिव अशोक मलिक यांनी स्पष्ट केलं आहे.
पीआयबीवर (प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो) उपलब्ध असलेला व्हिडीओ पाहिला, तरी V ही पहिली रांग असल्याचं स्पष्ट होतं. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, यूपीएच्या नेत्या सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, मुलायम सिंह, गुलाम नबी आझाद, राष्ट्रवादीचे नेते शंकरसिंह वाघेला ही सर्व नेतेमंडळी या V रांगेतच बसल्याचं पाहायला मिळतं आहेत.
शपथविधी सोहळ्याच्या पासेसचे V, V1, V2, V3 असे भाग करण्यात आले होते. त्यापैकी V ही रांग अतिमहत्त्वाच्या पाहुण्यांसाठी होती. यासंदर्भात अशोक मलिक यांनी एका बातमीचा संदर्भ देताना V बद्दलचा खुलासा केला आहे. त्यामुळे पवारांचा किंवा महाराष्ट्राचा अपमान करण्याचा कुठलाही हेतू मोदी सरकारचा अथवा राष्ट्रपती भवनमधील प्रशासकीय यंत्रणांचा नसल्याचे उघड झाले आहे. दरम्यान, नरेंद्र मोदींच्या शपथविधीच्या दिवशी म्हणजेच 30 मे रोजी शरद पवार दिल्लीत होते. राहुल गांधी आणि त्यांची भेटही झाली होती. परंतु, संध्याकाळी ते राज्यात परतले होते. ते शपथविधीला का गेले नाहीत, याबद्दल स्वतः पवारांनी किंवा राष्ट्रवादीच्या नेत्याने अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.
विशेष म्हणजे राष्ट्रपती भवनातील सूत्रांच्या हवाल्याने lokmat.com ने या संदर्भात कालच बातमी दिली होती. त्यानंतर आता खुद्द राष्ट्रपतींच्या सचिवांनीच ट्विटरवरून खुलासा केल्यानं या मानापमान नाट्यावर पडदा पडला आहे. उलट, राष्ट्रवादीचे अनेक कार्यकर्ते नाकावरच आपटले आहेत.