वडोदरा : गुजरातच्या वडोदरा येथील २४ वर्षीय क्षमा बिंदूने अखेर स्वतःशीच लग्नगाठ बांधली आहे. यापूर्वी ११ जून रोजी लग्न करण्याचे तिने जाहीर केले होते, परंतु वाद टाळण्यासाठी क्षमाने तीन दिवस आधीच लग्न उरकले. तिच्या लग्नाला काही जणांकडून विरोध होत होता. म्हणून बुधवारी एका घरगुती समारंभात ती स्वत:सोबत विवाहबंधनात अडकली. या लग्नाचे फोटो तिने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
वडोदरातील गोत्री येथील आपल्या राहत्या घरीच तिने लग्न केले. ४० मिनिटांच्या लग्न सोहळ्यात मेंदी, हळदी समारंभ, सप्तपदी सर्वकाही अगदी पारंपरिक पद्धतीने झाले. त्यानंतर आरशासमोर उभे राहून तिने कपाळात सिंदूरही भरले व मंगळसूत्रदेखील घातले. या लग्नात नवरदेव तर नव्हताच, पण भटजीही नव्हते. एका भटजीने सुरुवातीला लग्न लावण्यासाठी होकार दर्शवला होता, पण विरोध पाहून त्यानेही नंतर नकार दिल्याचे समजते. अखेर मोबाईलवर मंत्रोच्चार सुरू होते. १० मोजक्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाइकांच्या उपस्थितीत तिने थाटामाटात लग्न केले.
मला मंदिरात लग्न करायचं होतं, पण...गेल्या काही दिवसांपूर्वी तिने स्वत:शी लग्न करण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर अनेकांनी विरोध केला होता. भाजपच्या स्थानिक नेत्या सुनीता शुक्ला यांनी क्षमाला कोणत्याही मंदिरात लग्न करू देणार नाही असे म्हटले होते. तिच्या शेजारी-पाजारी व काही नातेवाइकांनीही यावर आक्षेप घेतला होता. मला मंदिरात लग्न करायचं होतं, पण वाद टाळण्यासाठी मला स्थळ बदलावं लागलं. लग्नाच्या दिवशी कोणीतरी गोंधळ घालेल अशी भीती मनात होती आणि मला जीवनातल्या सर्वात खास दिवशी कोणतेही विघ्न नको होते म्हणून तीन दिवस आधी आणि घरातच गुपचूप लग्न केल्याचे क्षमाने सांगितले.