PM Narednra Modi on The Sabarmati Report: अभिनेता विक्रांत मॅसीचा 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. गुजरातच्या गोध्रा दंगलीवर आधारित या चित्रपटाने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे लक्ष वेधून घेतले आहे. या चित्रपटाबाबत पीएम मोदींनी पोस्ट केली असून, सत्य सर्वांसमोर येतेच, असे त्यांनी लिहिले आहे.
पंतप्रधान मोदी काय म्हणाले?पीएम मोदींनी त्यांच्या अधिकृत एक्स हँडलवरून आलोक भट्ट नावाच्या युजरची एक्स पोस्ट शेअर केली आहे. गोध्रा घटनेवर बनवलेल्या 'द साबरमती रिपोर्ट' या चित्रपटाचा ट्रेलरही या पोस्टसोबत जोडण्यात आला आहे. रिपोस्ट करताना पीएम मोदींनी लिहिले की, "सत्य समोर येत आहे, ही चांगली गोष्टी आहे. सामान्य लोकही ते पाहू शकतील. बनावट गोष्टी काही काळासाठी दाखवता येतात, पण तथ्ये नेहमीच बाहेर येतात," असे पीएम मोदी म्हणाले.
पंतप्रधानांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये चित्रपटाबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. 'द साबरमती रिपोर्ट' हा चित्रपट का पाहावा? हे या पोस्टमधून सांगितले आहे.
1. हा प्रयत्न प्रशंसनीय आहे. अलीकडील इतिहासातील सर्वात लज्जास्पद घटनांपैकी एक, याचे सत्य ते समोर आणते.2. निर्मात्यांनी चित्रपटातील संवेदनशील मुद्दे अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळले आहेत आणि तितक्याच प्रामाणिकपणे तो बनवला आहे.3. साबरमती एक्स्प्रेसच्या प्रवाशांना जाळण्याच्या या घृणास्पद घटनेचे राजकारण करण्याचा प्रयत्न कसा केला गेला, याचा सखोल विचार करणे आपल्या सर्वांसाठी गरजेचे आहे.4. शेवटी, 59 निष्पाप पीडितांना त्यांचे विचार मांडण्याची संधी मिळाली. हा चित्रपट खरोखरच त्या 59 निष्पाप पुरुष, स्त्रिया आणि बालकांना श्रद्धांजली आहे, ज्यांनी त्या दिवशी आपला जीव गमवला होता.
'द साबरमती रिपोर्ट' गोध्रा घटनेवर आधारित दरम्यान, 27 फेब्रुवारी 2002 रोजी घडलेल्या गोध्रा घटनेवर आधारित द साबरमती रिपोर्ट हा चित्रपट 15 नोव्हेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात विक्रांत मॅसी, राशी खन्ना आणि रिद्धी डोग्रा मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाची निर्मिती एकता कपूरच्या बालाजी मोशन पिक्चर्सने केली आहे. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर तुफान प्रतिसाद मिळाला आहे.
त्या दिवशी काय घडले?गुजरातमधील गोध्रा येथे अयोध्येहून साबरमती एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या कारसेवकांच्या बोगीला आग लागली. या हृदयद्रावक घटनेत 59 जणांना आपला जीव गमवावा लागला होता. याच्या एका दिवसानंतर, 28 फेब्रुवारीपासून गुजरातमध्ये भीषण जातीय दंगली घडल्या, ज्यात सुमारे 1000 लोकांना आपला जीव गमवावा लागला. गोध्रा घटनेच्या वेळी पंतप्रधान मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते.