ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि.15 - व्हॉट्सअॅप चे नवीन फिचर व्हिडीओ कॉलिंग येणार येणार म्हणून अनेक दिवसांची प्रतीक्षा अखेर संपली. व्हॉट्सअॅपने बिटा व्हर्जन साठी व्हिडीओ कॉलिंग ची सुविधा चालू केली आहे. मात्र व्हिडीओ कॉलिंगचा वापर करण्यासाठी एकच अट सध्या आहे ती म्हणजे तुम्ही ज्या व्हॉट्सअॅप युझर्सला व्हिडीओ कॉल करत आहेत त्याने सुद्धा व्हॉट्सअॅप अपडेट केले असले पाहिजे तरच तुम्ही व्हिडीओ कॉलिंगचा आनंद घेऊ शकता .
व्हॉट्सअॅपचा वापर जगभरात सगळ्यात जास्त होतो आहे. व्हॉट्सअॅप सध्या जगातील सर्वाधिक वापरले जाणारे मेसेंजर अॅप आहे. आपल्या युझर्सला नेहमी नवीन नवीन फिचर्स देण्यासाठी सुद्धा व्हॉट्सअॅप नेहमी पुढे असतो. याच कारणामुळे दररोज व्हॉट्सअॅपचा वापर करणाऱ्या युझर्स ची संख्या वाढतच आहे. आता व्हॉट्सअॅपने त्यांच्या युझर्सला अजून एक नवीन फिचरची भेट दिली आहे. व्हॉट्सअॅपने व्हिडीओ कॉलिंग फीचर सुरु केलं आहे
तस बघीतले तर मेसेंजिंग अॅप च्या दुनियेत व्हिडीओ कॉलिंग ही सेवा काही नवीन नाही. कारण या अगोदर स्नॅपचॅट ,फेसबुक मेसेंजर ,व्हायबर ,हँगआउट तसेच व्हिडीओ कॉलिंगचा बादशहा अशी ज्याची ओळख आहे ते म्हणजे स्काईप आदी मेसेंजिंग अॅप व्हिडीओ कॉलिंग ही सेवा आधीपासूनच देत आहे. मात्र टेक्नोसॅव्ही जगतात व्हॉट्सअॅप व्हिडीओ कॉलिंग फीचर कधी सुरु करतो यावर जगभरातील टेक्नो प्रेमींचे लक्ष लागून राहिले होते. आता मात्र व्हॉट्सअॅपने व्हिडीओ कॉलिंग फीचर सुरु केलं आहे.
व्हिडीओ कॉलिंग कसे कराल ?
तुम्ही तुमचे व्हॉट्सअॅप अपडेट केले कि चॅट च्या बाजूला असलेल्या कॉल्स ला क्लिक केल्यानंतर वर उजव्या बाजूला प्लस साइन असलेले कॉलिंग चा सिम्बॉल दिसेल . त्याला क्लिक केले कि कॉन्टॅक्ट ची लिस्ट तुमच्या समोर येईल त्यामध्ये प्रत्येक कॉन्टॅक्ट समोर व्हॉइस आणि व्हिडिओ कॉल असे दोन ऑप्शन तुम्हाला दिसेल . त्यापैकी व्हिडीओ कॉलिंग लोगो वर क्लिक करून तुम्ही व्हिडीओ कॉल करू शकता मात्र ज्याला तुम्ही व्हिडीओ कॉल करताय त्याने व्हॉट्सअॅप अपडेट केले असले पाहिजे तरच तुमचा व्हिडीओ कॉल पूर्ण होईल .