नवी दिल्ली - 'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' या नावाने लेखक जयभगवान गोयल यांनी नरेंद्र मोदींवर पुस्तक लिहिलं होतं. या पुस्तकाचं प्रकाशन दिल्ली भाजपा कार्यालयात करण्यात आलं होतं. मात्र या वादावरुन महाराष्ट्रात संतप्त प्रतिक्रिया उमटल्यानंतर भाजपाने हे पुस्तक मागे घेतलं आहे. लेखक जयभगवान गोयल यांनी या प्रकारावर माफी मागितली आहे.
या प्रकारावर बोलताना केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले की, देशभरात कालपासून लोकांमध्ये या पुस्तकामुळे नाराजी व्यक्त होत होती. छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना होऊच शकत नाही. जयभगवान गोयल यांनी जे पुस्तक लिहिलं आहे त्याचा भाजपाशी काही संबंध नाही. पुस्तक प्रकाशित होईपर्यंत यात काय आहे याची कल्पना नव्हती. आज त्यांनी भेटून माफी मागितली आहे. हे पुस्तक मागे घेण्यात आलं आहे असं जावडेकरांनी सांगितले.
तसेच छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना होऊ शकत नाही. शिवाजी महाराज जगाचे राजे होते, कल्याणकारी राज्य त्यांनी चालवलं त्यामुळेच इतक्या वर्षांनंतर त्यांचे स्मरण आजही लोकं करतात. अतुलनीय व्यक्तिमत्वाची तुलना केली जाऊ शकत नाही. या पुस्तकामुळे अनेक ठिकाणी आंदोलन झालं. हे पुस्तक ज्यांनी लिहिलं आहे ते लेखक जयभगवान गोयल यांनी माफी मागितली आहे. हे पुस्तक मागे घेण्यात आलं आहे. हा मुद्दा इथे संपवावा अशी विनंती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केली आहे.
दरम्यान, जाणीवपूर्वक शिवरायांचा अवमान भाजपाकडून केला जातो. जनतेत जो आक्रोश केला जात होता. विरोधक राजकारण करतंय असं भाजपा आरोप करत होती. मात्र ही जनभावना होती असं मतं काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी व्यक्त केली आहे. तर भाजपाकडून जाणीवपूर्वक असे प्रकार घडवण्यात येतात. त्याचा जनतेत काय प्रतिक्रिया उमटतात हे भाजपा पाहतं. महाराष्ट्रातल्या सर्व जनतेचा हा विषय आहे. विषय संपवा हे जनता ठरवणार आहे असं विधान अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी केलं आहे.