नवी दिल्ली - विकास आणि रोजगार वाढविणे तसेच अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी केंद्र सरकारने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 30 हून अधिक उद्योग विश्लेषक आणि अर्थतज्ज्ञांची बैठक घेतली. ही बैठक सुमारे दोन तास चालली. मात्र या बैठकीला अर्थमंत्री निर्मला सीतारामन गैरहजर असल्याचे समजते. यावरून काँग्रेसने अर्थमंत्र्यांच्या गैरहजेरीवरून भाजपवर टीका केली आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाच ट्रिलयनची अर्थव्यवस्था बनविण्यासंदर्भात चर्चा केली. तसेच मागणी आणि पुरवठा वाढविण्यासंदर्भात अर्थतज्ज्ञांकडून सूचना मागविल्या. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, वाणिज्यमंत्री पियूष गोयल आणि केंद्रीयमंत्री नितीन गडकरी उपस्थित होते. मात्र अर्थमंत्री निर्मला सीतारामन यावेळी दिसल्या नाही.
यावरून काँग्रेसने भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका केली आहे. त्याला भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात आले. तसेच भाजपच्या ट्विटर हँडलवर अर्थमंत्री सीतारामन, पक्षाच्या महासचिवांसह प्रभारी आणि प्रवक्त्यांच्या बैठकीत बजेट संदर्भात सूचना घेत होत्या, असं सांगण्यात आले.
दुसरीकडे काँग्रेसने नीती आयोगाच्या बैठकीचा एक फोटो शेअर केला. त्यावर म्हटले की, एका महिलेवर जी जाबदारी सोपविण्यात आली ते करण्यासाठी किती पुरुष उपस्थित आहेत. तसेच पुढच्या वेळी बजेटपूर्वी होणाऱ्या बैठकीत अर्थमंत्र्यांना बोलवा, अशी पोस्ट काँग्रेसने ट्विटरवर शेअर केली आहे.
दरम्यान निर्मला सीतारामन यांनी आधीच उद्योजक आणि अर्थतज्ज्ञांची बैठक घेऊन चर्चा केल्याचे अर्थमंत्रालयाच्या कार्यालयातून सांगण्यात आले आहे.