नवी दिल्ली : देशात सध्या मंदीचे वारे आहेत. औद्योगिक क्षेत्रासह गृहनिर्माण क्षेत्रातही सुस्ती आलेली आहे. कंपन्या बंद ठेवाव्या लागत आहेत. मागणी घटल्याने देशभरातील गृहनिर्माण प्रकल्प रखडले आहेत. अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी आज या क्षेत्रासाठी मोठी मदत देण्याची घोषणा केली आहे.
अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांनी देशातील परिस्थितीवर भाष्य केले. यावेळी त्यांनी तब्बल 4.5 लाख घरांची निर्मिती रखडल्याचे मान्य करत केंद्र सरकार ही घरे पूर्ण करण्यासाठी 35 हजार कोटींची आर्थिक मदत देण्याचे जाहीर केले आहे.
सध्या देशभरात रखडलेल्या गृहनिर्माण प्रकल्प, योजनांची संख्या 1600 वर आहे. या मदतीचा फायदा परवडणाऱ्या घरांना आणि मध्यम वर्गीय लोकांसाठी बनविण्यात येणाऱ्या प्रकल्पांना होणार आहे. या निधीमुळे स्वस्त आणि सोप्या अटींवर पैसा पुरविला जाणार आहे. याचा फायदा परवडणाऱ्या गृहप्रकल्पांसाठी होणार आहे.
रखडलेल्या गृह निर्माण प्रकल्पांसाठी सेबीच्या मदतीने 10000 कोटी रुपयांचा पर्यायी विशेष फंड तयार केला जाणार आहे. तसेच केंद्रीय मंत्रिमंडळाने विशेष खिडकी योजनाही सुरू करण्यास मंजुरी दिल्याचे सितारामन यांनी सांगितले. तर 25000 कोटींचा मदत निधी एलआयसी, स्टेट बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून उभारण्यात येणार आहे.