नवी दिल्ली- अर्थमंत्री अरूण जेटली यांनी त्यांच्या शेवटच्या पूर्ण अर्थसंकल्पात मध्यमवर्गिय आणि गरिबांसाठी अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. उज्ज्वला योजनेअंतर्गत सरकाने 5 करोड गरिब महिलांपर्यंत मोफत गॅस कनेक्शन पोहचविण्याचं लक्ष्य ठेवलं होतं. या योजनेची लोकप्रियता पाहता हे लक्ष्य वाढवून 8 करोड गरिब महिलांना मोफत गॅस कनेक्शन पोहचविण्याचं लक्ष ठेवण्यात आलं आहे.
घरातील वीज गेल्यावर सगळेच चिंतीत असतात या मुद्याकडे लक्ष केंद्रीत करून सरकारने सौभाग्य योजनेची सुरूवात करणार असल्याची घोषणा केली. या योजनेअंतर्गत 16 हजार करोड रूपये खर्च करून 4 करोड कुटुंबांपर्यंत वीज पोहचविली जाणार आहे.
2022पर्यंत प्रत्येक गरिब व्यक्तीला घर मिळवून देण्याचं सरकारचं लक्ष्य आहे, असं अरूण जेटली यांनी म्हंटलं. याअंतर्गत सरकारने शहरी क्षेत्रात 37 लाख घर बनविण्याच्या योजनेला मंजुरी दिली आहे. याशिवाय नव्या आर्थिक वर्षात सरकारने 2 करोड शौचालयं बनविण्याची घोषणा केली आहे.