अतुल कुलकर्णी मुंबई : पंजाब नॅशनल बँकेची सुमारे ११ हजार कोटींची फसवणूक करून परदेशात पलायन केलेल्या नीरव मोदीमुळे सरकारची नाचक्की झाल्याने वित्तमंत्री अरुण जेटली यांच्यावर पंतप्रधान नाराज आहेत. कदाचित त्यांचे खातेही बदलले जाईल, असा दावा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.पीएनबी घोटाळा समोर आल्याने वित्त मंत्रालयाचे पितळ उघडे पडले आहे. याबाबत पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ) वित्त विभागावर ठपका ठेवला आहे. त्यामुळे वित्तमंत्री जेटली प्रचंड दबावाखाली असल्यामुळे काहीही बोलायला तयार नाहीत,असा आरोपही चव्हाण यांनी केला. पीएनबी घोटाळ्यामुळे ठेवीदारांमध्ये भीती निर्माण झाली आहे. बँकेतील पैसा सुरक्षित आहे की नाही, याविषयी संभम्र आहे. वित्तमंत्र्यांनी मौनव्रत धारण केल्याने संशय बळावला आहे. नीरव मोदी राष्टÑीयीकृत बँकेला फसवून हजारो कोटींचा पैसा पळवतो. त्याचे पडसाद देशभर उमटतात, शेअर बाजार कोसळतो. अशा वेळी ठेवीदारांना दिलासा देण्याचे काम हे वित्तमंत्र्यांचे असते. मात्र त्यांनी मौन बाळगले आहे. या मौनाचे अनेक अर्थ लोक काढत आहेत. त्यामुळे परिस्थिती आणखी बिकट बनली तर त्याची जबाबदारी कोण घेणार, असा सवालही चव्हाण यांनी केला आहे.
वित्तमंत्री जेटलींवर मोदी नाराज!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 5:30 AM