नवी दिल्ली : कोविड-१९ महामारी कधी संपेल याबाबत काहीच सांगता येत नाही, या आजारावर खात्रीशीर लसही नाही. त्यामुळे अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झालेल्या आव्हानांचा सामना करण्यासाठी सरकारकडून सातत्याने प्रोत्साहन दिले जात आहे. खर्चातही कोणतीच हयगय केली जाणार नाही, असे प्रतिपादन केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी केले आहे.सीतारामन यांनी एका मुलाखतीत सांगितले की, मागील सहा महिन्यांत आव्हाने अजिबात कमी झालेली नाहीत. आव्हानांचे स्वरूप मात्र बदलले आहे. वित्त मंत्रालयाने प्रतिसादात्मक कृतीची गती वाढविली आहे.सीतारामन यांनी म्हटले की, प्रतिदशलक्ष रुग्णांची संख्या आणि मृत्यूचे प्रमाण यात अनेक कारणांनी घट झाली आहे. लोकांतील जागरूकता आणि खबरदारी हे त्यातील एक कारण आहे; पण चिंता अजूनही कायम आहे. आपल्याकडे अजूनही खात्रीशीर लस उपलब्ध नाही.साथ कधी संपेल याची कोणतीही तारीख सांगता येत नाही. काही ठिकाणाहून बातम्या येत आहेत की, बरे झालेल्या लोकांनाही पुन्हा लागण होत आहे.त्यामुळे सर्व छोट्या व मध्यम व्यावसायिक - उद्यमींच्या मनात अनिश्चितता घोंगावत आहे. त्यांचा जीडीपीतील वाटा ५५ टक्के आहे.उत्पादन क्षेत्राला गती देण्यासाठी प्रयत्न सुरूसरकारकडून केल्या जात असलेल्या खर्चाबाबत सरकारमधील एक गट असंतुष्ट दिसत असल्याचे निदर्शनास आणून दिले असता सीतारामन यांनी सांगितले की, नाही असे काहीही नाही. सरकारकडून प्रोत्साहन जारी केले जात आहे. खर्चातही कोणतीच हयगय केली जात नाही. सरकारी प्रयत्नांचे परिणामही काही प्रमाणात दिसून येत आहेत. वस्तू उत्पादन क्षेत्र पुन्हा झेप घेताना दिसून येत आहे. गावी गेलेले कामगार कार्यस्थळी परतत आहेत. याला आणखी गती देण्यासाठी सरकारकडून प्रोत्साहन दिले जात आहे.
कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर खर्चात हयगय नाही : सीतारामन
By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2020 2:11 AM