Union Budget 2024 : देशात तिसऱ्यांदा एनडीएचे सरकार स्थापन करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या मुख्यमंत्री नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांना मोदी सरकारने रिटर्फ गिफ्ट दिलं आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी संसदेत २०२४-२५ या आर्थिक वर्षाचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करताना बिहार आणि आंध्र प्रदेश या राज्यांसाठी मोठ्या निधीची घोषणा केली आहे. आंध्र प्रदेशसाठी मोठ्या निधीची घोषणा करताना अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी बिहारमध्ये मोठ्या मेडिकल कॉलेजची घोषणा केली आहे. त्यामुळे बिहारची विशेष राज्याची मागणी आणि टीडीपीने केलेली लोकसभा अध्यक्षपदाच्या ऐवजी त्यांच्या राज्यांवर केंद्राकडून पैशांचा पाऊस पाडण्यात आलाय.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात बिहार आणि आंध्र प्रदेशला मोठी भेट दिली आहे. अशा प्रकारे त्यांनी मित्रपक्षांनाही खूष ठेवण्याचे काम केले आहे. र्थमंत्र्यांनी बिहारसाठी नवीन विमानतळ, वैद्यकीय सुविधा आणि क्रीडा पायाभूत सुविधांची घोषणा केली. तसेच आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांची ही मोठी मागणी मान्य केली आहे. अर्थसंकल्पात आंध्र प्रदेशला विशेष पॅकेजची भेट मिळाली आहे. पुनर्रचनेच्या वेळी दिलेली सर्व आश्वासने पूर्ण केली जातील, असे अर्थमंत्र्यांनी सांगितले.
केंद्र सरकारने २०२४ च्या अर्थसंकल्पामध्ये बिहारला मोठी भेट दिली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बिहारमध्ये नवीन विमानतळ, वैद्यकीय सुविधा आणि क्रीडा पायाभूत सुविधांची घोषणा केली. याशिवाय राज्यातील महामार्गांसाठी आणखी २६ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याची घोषणा केली आहे. याशिवाय बक्सर-भागलपूर द्रुतगती मार्गाचीही घोषणा करण्यात आली. बिहारमध्ये नवीन वैद्यकीय महाविद्यालये बांधली जातील. त्याचबरोबर नवीन विमानतळही बांधण्यात येणार आहे.
१० वर्षात पहिल्यांदाच आंध्र प्रदेशवर लक्ष
१० वर्षांत प्रथमच आंध्र प्रदेशला अर्थसंकल्पात महत्त्वाचे स्थान मिळाले आहे. पूर्वेकडील काही राज्यांपैक सरकारचे विशेष लक्ष आहे. आंध्र प्रदेश पुनर्रचना कायद्यात अर्थमंत्र्यांनी राज्याच्या भांडवलाची गरज मान्य केली आहे. आंध्र प्रदेशची राजधानी म्हणून अमरावती शहराच्या उभारणीसाठी केंद्र सरकारने अर्थसंकल्पात १५,००० कोटी रुपयांची घोषणा केली आहे. ही घोषणा आंध्र प्रदेशसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. त्यामुळे राज्यातील विकासाचा वेग वाढण्याची अपेक्षा आहे. अमरावतीला आधुनिक आणि विकसित शहर बनवण्यासाठी केंद्र सरकारने या प्रकल्पाला प्राधान्य दिले आहे.
पूर्वोदय योजनेची घोषणा
यासोबत निर्मला सीतारमन यांनी देशाच्या पूर्वेकडील राज्यांच्या विकासासाठी पूर्वोदय योजनेची घोषणा केली. केंद्राने बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा आणि आंध्र प्रदेशच्या विकासासाठी पूर्वोदय योजना जाहीर केली आहे. या अंतर्गत मानव संसाधन विकास आणि मूलभूत विकासाकडे लक्ष दिले जाणार आहे. या योजनेत अमृतसर-कोलकाता इंडस्ट्रियल कॉरिडॉर अंतर्गत गया येथे एक औद्योगिक केंद्र बांधले जाईल. सांस्कृतिक केंद्रे आधुनिक आर्थिक केंद्र म्हणून विकसित केली जातील. या मॉडेलचे नाव विकास भी विरासत भी असं असणार आहे.
याशिवाय बिहारमध्ये रस्त्यांचे जाळे वाढवण्यात येणार आहे. याअंतर्गत पाटणा-पूर्णिया द्रुतगती मार्ग, बक्सर भागलपूर द्रुतगती मार्ग, बोधगया-राजगीर वैशाली दरभंगा द्रुतगती मार्ग बांधण्यात येणार आहेत. याशिवाय बक्सरमध्ये गंगा नदीवर दोन पदरी पूलही बांधण्यात येणार आहे. यासाठी २६००० कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. पीरपेंटी येथे २१४०० कोटी रुपये खर्चून २४०० मेगावॅट क्षमतेचा पॉवर प्लांट बांधण्यात येणार आहे.