लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : कोरोना काळात विविध पातळ्यांवर योध्याची भूमिका पार पाडणाऱ्यांना लोकमत वृत्तपत्र समूह 'महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' हा पुरस्कार देऊन गौरव करीत असल्याचे ऐकून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकमतच्या सामाजिक दायित्वाचे कौतुक केले.
लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन आणि माजी खासदार विजय दर्डा आणि सुप्रसिद्ध नेत्रशल्य चिकित्सक खासदार पद्मश्री डॉ. विकास महात्मे यांनी आज अर्थमंत्री सीतारामन यांची भेट घेतली. दर्डा यांनी लोकमततर्फे देण्यात येणाऱ्या या पुरस्कार सोहळ्याला अतिथी म्हणून येण्याचे निमंत्रण दिले तेव्हा सीतारामन यांनी लोकमतच्या विविध सामाजिक उपक्रमांबाबत जाणून घेत आनंद व्यक्त केला. केंद्रीय अर्थसंकल्पातील विविध मुद्यांवर अर्थमंत्र्यांनी दर्डा आणि डॉ. महात्मे यांच्याशी चर्चा करून मतही जाणून घेतले. आजच्या अत्यंत विपरीत परिस्थितीत उत्तम अर्थसंकल्प सादर केल्याबद्दल दर्डा यांनी निर्मला सीतारामन यांचे अभिनंदन केले. शिवाय कोरोना काळात वृत्तपत्र व्यवसाय अत्यंत डबघाईस आला असून केंद्र सरकारने याला आर्थिक उभारी देण्याची नितांत गरज असल्याची विनंती दर्डा यांनी केली.
पंतप्रधान मोदी यांना भेटण्यासाठी जाणाऱ्या प्रत्येकाची कोरोना टेस्ट केली जाते. ती निगेटिव्ह असेल तरच त्यांना भेटण्याची परवानगी मिळते. पण अर्थसंकल्प तयार करताना त्यांना अनेकदा भेटावे लागले आणि त्यावेळी मला ती टेस्ट करावी लागली नाही, असेही अर्थमंत्री सीतारामन यांनी आवर्जून सांगितले..