नवी दिल्ली-
देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज लोकसभेत विरोधकांनी महागाईच्या मुद्द्यावरुन सरकारला घेरलं असताना सरकारची भूमिका स्पष्ट केली. विरोधकांच्या आरोपांना उत्तर देताना सीतारामन यांनी विरोधकांनी श्रीलंका, बांगलादेश, पाकिस्तानचे दाखले देण्यापेक्षा अमेरिकेशी तुलना करावी, असा टोला लगावला. महागाईच्या मुद्द्यावर विरोधकांनी केलेल्या प्रत्येक आरोपाला सीतारामन यांनी उत्तर दिलं.
"बांगलादेश आणि श्रीलंकेशी का तुलना करता? भारताची अमेरिकेशी तुलना करा ना. अमेरिकेसोबत तुलना केली तर २०१८-१९ मध्ये यूएसच्या बॅलन्सशीटमध्ये सेंट्रल बँकेचा जीडीपी २० टक्के, २०१९-२० मध्ये १९ टक्के, २०२०-२१ मध्ये ३५ टक्के आणि २१-२२ मध्ये ३८ टक्के राहिला आहे. महागाईच्या मुद्द्यावरुन राजकारण करू नका. भारत वेगानं पुढे जात आहे. जग कुठं जात आहे हेही पाहणं महत्वाचं आहे. महागाईच्या मुद्द्यावर इतर देशांशी तुलना करणं योग्य नाही", असं सीतारामन म्हणाल्या.
महागाईचा दर ७ टक्क्यांच्या खाली आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याचंही त्यांनी लोकसभेत सांगितलं. जीएसटी आणि मायक्रो डेटाचा हवाला देत त्यांनी भारतीय अर्थव्यवस्था अधिक मजबूत होत असल्याचंही त्या म्हणाल्या. भारत मंदीचा सामना करण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. जागतिक यंत्रणांनी केलेला अभ्यास जर आपण पाहिला तर भारत सर्वाधिक वेगानं वाढत असलेली अर्थव्यवस्था असल्याचं दिसून येईल, असंही त्या म्हणाल्या.
सीतारामन यांनी यावेळी आरबीआयचे माजी गर्व्हनर रघुराम राजन यांच्या विधानाचाही दाखला दिला. आरबीआय चांगलं काम करत आहे असं रघुराम राजन यांनीही म्हटलं आहे. कर्ज कमी करण्यासाठी मोदी सरकार चांगलं काम करत आहे असंही ते म्हणाल्याचं सीतारामन संसदेत म्हणाल्या. आपल्याकडे पर्याप्त चलन आहे आणि पाकिस्तान, श्रीलंकेसारख्या परिस्थितीला सामोरं जाण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही, असंही सीतारामन म्हणाल्या.