नवी दिल्ली: देशाची अर्थव्यवस्था संकटात असून त्यामधून बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग सरकारकडे नाही, असं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे पती पराकला प्रभाकर यांनी एका लेखात म्हटलं आहे. भारतीय अर्थव्यवस्थेची स्थिती वाईट आहे. ही परिस्थिती सुधारण्यासाठी सरकारनं लवकरात लवकर आवश्यक पावलं उचलायला हवीत, असं प्रभाकर यांनी 'द हिंदू' वृत्तपत्रासाठी लिहिलेल्या एका लेखात म्हटलं आहे. प्रभाकर हैदराबादमधील राईट फोलियो नावाच्या खासगी कंपनीत व्यवस्थापकीय संचालक आहेत. 'भारतीय अर्थव्यवस्थेची स्थिती वाईट आहे. मात्र हे वास्तव मान्य करण्याची सरकारची तयारी नाही. परंतु समोर येणाऱ्या आकडेवारीतून अर्थव्यवस्थेसमोरील संकट दिसून येत आहे. अनेक क्षेत्रांमध्ये मंदीचा परिणाम जाणवू लागला आहे,' असं प्रभाकर यांनी लिहिलं आहे. घटलेला जीडीपी आणि त्यामुळे गेलेल्या नोकऱ्या याची आकडेवारीदेखील त्यांनी लेखात दिली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीतील जीडीपी वाढीचा दर ५ टक्क्यांवर आला आहे. गेल्या ६ वर्षांमधील हा निच्चांक आहे. तर बेरोजगारीच्या दरानं गेल्या ४५ वर्षांमधील उच्चांक गाठला आहे, असं प्रभाकर यांनी म्हटलं आहे. अर्थव्यवस्थेला संकटातून बाहेर काढण्यासाठी सरकारकडे काही ठोस रणनीती आहे असं मला वाटत नाही. भाजपाच्या नेतृत्त्वाला याची कल्पना असल्यानंच त्यांनी अर्थव्यवस्थेचा मुद्दा लोकसभा निवडणुकीत उपस्थित केला नाही. त्याऐवजी त्यांनी राष्ट्रवाद, राष्ट्रीय सुरक्षा हेच विषय केंद्रस्थानी ठेवले, अशा शब्दांमध्ये प्रभाकर यांनी भाजपाच्या लोकसभा निवडणुकीतील रणनीतीचं विश्लेषण केलं. नेहरुंची आर्थिक धोरणं राबवायची नाहीत, हे भाजपा नेतृत्त्वानं निश्चित केलं आहे. अर्थव्यवस्था संकटात असण्यामागचं हे प्रमुख कारण आहे. नेहरुंची धोरणं लागू करायची नाहीत, हे जरी निश्चित असलं तरी त्याला पर्याय म्हणून काय धोरणं राबवायची, याचं उत्तर सरकारकडे नाही, असं प्रभाकर यांनी लेखात म्हटलं आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे पतीच म्हणतात, मोदी सरकारमुळे अर्थव्यवस्था संकटात
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2019 3:41 PM