नवी दिल्ली : केंद्र सरकारने करदात्यांना माेठा दिलासा दिला आहे. काेराेनाच्या उपचारासाठी करण्यात आलेला खर्च, तसेच आर्थिक मदतीला प्राप्तीकरातून सवलत देण्यात आली आहे. केंद्रीय अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी ही माहिती दिली. कंपनीने कर्मचाऱ्यांच्या उपचारासाठी किंवा इतर काेणत्याही व्यक्तीने इतर व्यक्तीवर काेराेना उपचारासाठी केलेल्या खर्चावर कर आकारण्यात येणार नाही.
आर्थिक वर्ष २०१९-२० आणि त्यानंतरच्या वर्षासाठी ही सवलत देण्यात येणार आहे. महत्त्वाचे म्हणजे, काेराेनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्यात आली हाेती. कर्मचाऱ्यांना त्यांच्या नियाेक्त्यांकडून मिळालेल्या काेणत्याही रकमेवर कर आकारण्यात येणार नाही, तर इतर व्यक्तींकडून मिळालेल्या १० लाख रुपयांपर्यंतच्या मदतीच्या रकमेवरही प्राप्तीकर आकारण्यात येणार नाही.
स्रोतवर कर कपातीसाठी देण्यात येणाऱ्या टीडीएस प्रमाणपत्राच्या वितरणासाठीही ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. याशिवाय ‘विवाद से विश्वास’ याअंतर्गत वादग्रस्त कर प्रकरणांसाठीही ३१ ऑक्टाेबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच करबचतीसाठी घर खरेदीसाठीही तीन महिन्यांची मुदतवाढ मिळाली आहे.
आधार-पॅन जाेडणीला मुदतवाढ
सरकारने आधार आणि पॅन लिंकिंगसाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. यापूर्वी ही मुदत ३० जुलैपर्यंत हाेती.