मदुराई : पत्नीने नोकरी-धंदा करून आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हावे आणि तिने पतीवर अवलंबून न राहता स्वत:चा चरितार्थ चालवावा, अशी अपेक्षा हिंदू पतीने बाळगणे हे हिंदू धर्माच्या तत्त्वज्ञानात न बसणारे आहे, असे मत मद्रास उच्च न्यायालयाने व्यक्त केले आहे.न्यायालयाच्या मदुराई खंडपीठाचे न्यायाधीश न्या. पी. देवदास यांनी एका पोस्टमनने केलेली पुनरिक्षण याचिका फेटाळताना हे मत नोंदविले. या पोस्टमनने त्याच्या घटस्फोटित पत्नीस व दोन वर्षांच्या मुलीस दरमहा पाच हजार रुपये पोटगी द्यावी, असा आदेश येथील कुटुंब न्यायालयाने दिला होता. त्याविरुद्ध या पोस्टमनने ही पुनरिक्षण याचिका केली होती.कुटुंब न्यायालयाच्या निकालास आव्हान देताना या पोस्टमनने इतर मुद्द्यांखेरीज एक असा मुद्दा मांडला होता की, त्याची पत्नी एका दुकानात नोकरी करते व स्वत:चा चरितार्थ चालविण्यासाठी तिची कमाई पुरेशी आहे. न्या. देवदास यांनी वरीलप्रमाणे मत नोंदवित हा मुद्दा फेटाळताना म्हटले की, एकतर पत्नी नोकरी करते याचे अर्जदाराने पुरावे दिलेले नाहीत. अर्जदार हिंदू असल्याने पत्नीने नोकरी करणे अथवा न करणे गैरलागू आहे, कारण हिंदू व्यक्तिगत कायद्यानुसार पत्नीच्या चरितार्थाची जबाबदारी पतीवरच असते. पत्नीने नोकरी-धंदा करून चरितार्थ स्वत: चालवावा, असे हिंदू पती म्हणू शकत नाही.तत्त्वज्ञानाच्या विरुद्ध : न्या. देवदास म्हणतात की, तू कामधंदा करून स्वत:पुरते कमावणार असशील तरच लग्न करीन, अशी अट लग्नाआधी पत्नीला घालून तिच्याशी विवाह करण्याची सोय हिंदू कायद्यात कुठेही नाही. पतीने असा विचार करून लग्न करणे किंवा लग्नानंतर पत्नीकडून अशी अपेक्षा करणे हे हिंदू धर्मशास्त्राच्या तत्त्वज्ञानाच्या विरुद्ध आहे.किमान गरजांना कात्री नको : माझा पगार तुटपुंजा आहे; शिवाय घरात म्हातारी आई, विधवा बहीण व तिची मुलेही आहेत व त्यांचा खर्चही माझ्यावरच आहे. त्यामुळे पत्नी व मुलीला दरमहा पाच हजार रुपये उचलून देणे माझ्या आवाक्याबाहेरचे आहे, असेही या पोस्टमनचे म्हणणे होते. यावर न्यायालयाने म्हटले की, मदुराईसारख्या शहरात दोन माणसांच्या महिन्याच्या खर्चासाठी पाच हजार रुपये ही रक्कम अव्वाच्या सव्वा नाही; शिवाय घरातील इतर लोकांचीही जबाबदारी आहे असे म्हणून पत्नी व मुलीच्या किमान गरजांना कात्री लावता येणार नाही.
पत्नीचे आर्थिक स्वावलंबन हिंदू धर्मशास्त्रात न बसणारे - हायकोर्ट
By admin | Published: July 15, 2016 2:41 AM