मुंबई - चीनच्या सीमेजवळ देशाचं संरक्षण करण्यासाठी तैनात एका जवानाची पत्नी 22 दिवसांपासून एक वर्षाच्या मुलीसह बेपत्ता आहे. तिचं नक्षलवाद्यांनी अपहरण केलं असावं किंवा मानवी तस्करीची ती बळी पडली असावी, असा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला आहे. अरूणाचल प्रदेशातील मराठी जवानाच्या बाबतीत ही घटना घडली आहे. यामध्ये सगळ्यात धक्कादायक म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांपासून देशाच्या संरक्षण मंत्र्यांपर्यंत एकानेही या जवानाची फिर्याद ऐकली नाही. 22 दिवस हिमालयाच्या दऱ्या खोऱ्यात आपल्या आठ वर्षाच्या मुलाला पाठीवर घेऊन या जवानाने बायकोचा शोध घेतला. पण तरीही त्यांना यश मिळालं नाही. एबीपी माझा या वृत्तवाहिनीने हे वृत्त दिलं आहे.
आईचं गेल्या 22 दिवसांपूर्वी बाबांशी थोडं भांडणं झालं त्यानंतर ती घराबाहेर पडली. सोबत एक वर्षाची आरा होती. तेव्हापासून आई बेपत्ता आहे, अशी माहिती मुलगा ओमने दिली आहे. आपली आई कुठे गेली असेल? हाच प्रश्न ओमला सतावतो आहे. ओमचे वडील अनिल अरुणाचल प्रदेशच्या टेंगा इथे भारतीय सैन्यात आर्टिलरी विभागात नायक आहेत. जवळच चीनची सीमा आहे. छोट्या-मोठ्या कारणावरून अनिलचा बायको स्वप्नाशी खटका उडाला. त्यानंतर दीड तासांनी घराबाहेर पडलेल्या स्वप्नाचा आजपर्यंत पत्ता लागला नाही. ओमला पाठीवर घेऊन अनिलने गावं पालथी घातली आहेत. पण तरीही स्वप्ना यांचा काहीही पत्ता लागला नाही.
अनिल ज्या टेंगा भागात तैनात आहेत, तिथून आसामच्या तेजपूरपर्यंतचा भाग नक्षलग्रस्त म्हणून ओळखला जातो. खंडणीसाठी अपहरणाच्या घटना इथं घडतात. मानवी तस्करांचं मोठं जाळं या भागात आहे. अनिलच्या माहितीवर रेजिमेंटने पोलिसांत तक्रार नोंदवली. 400 जणांच्या फौजेने गुवाहटीपर्यंत शोध घेतला. हिमालयातल्या वाहत येणाऱ्या नदीपात्रात पैसे देऊन मच्छीमार उतरवले. पण अरूणाचलच्या स्थानिक पोलिसांनी मदतीचा हात दिला नाही. अनिलचे भाऊ आणि मेहुण्यानेही महाराष्ट्रातून जाऊन अरूणाचलात शोध घेतला पण तोही व्यर्थ ठरला.
स्वप्ना गायब झाल्या त्याच्या दुसऱ्या दिवशीचं मिलीटरी चेक पोष्टवरचं एक सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळालं आहे. मिलीटरीने स्वप्ना आणि मुलीचे बॅनर तयार करून जागोजागी लावले आहेत. ओमसाठी सीसीटीव्हीतली आई हीच शेवटची आठवण उरली आहे. स्वप्नाचे सासू-सासरे, आई-वडील डोळ्यात पाणी आणून आठवणीने दिवसरात्र रडत आहेत. एक महिन्याच्या सुट्टीवर आलेल्या अनिललाही काही सुचत नाहीये. बायको आणि मुलीच्या आठवणीने हा जवान अक्षरशः हतबल झाला आहे.