सतत तणाव असलेल्या कोर्टात विनोदी काय घडले ते कळणार; दिल्ली हायकोर्टाचा नवा उपक्रम
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2024 06:45 AM2024-09-11T06:45:02+5:302024-09-11T06:45:36+5:30
ई- मेल आयडीवर मिळालेल्या पोस्ट नियुक्त समितीद्वारे तपासल्यानंतर संकेतस्थळावर प्रकाशित केल्या जातील.
डॉ. खुशालचंद बाहेती
नवी दिल्ली : न्यायालयीन कामकाज म्हणजे गंभीर प्रक्रिया. जिथे न्यायाधीश चेहरा सरळ ठेवण्यासाठी धडपडत असतात तर वकील आणि साक्षीदार भांडणात गुंतलेले असतात; पण कोर्टातील ताणतणाव दूर करण्यात विनोद महत्त्वाची भूमिका बजावते. त्याला महत्त्व देत दिल्लीउच्च न्यायालयाच्या वेबसाइटला लवकरच एक नवीन पृष्ठ जोडण्यात येत आहे ज्यावर न्यायदान कक्षातील अनपेक्षित विनोदी क्षणांच्या कथा वाचायला मिळतील.
या उपक्रमांत त्यांच्या वेबसाइटवर एक विशेष विभाग तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. जिथे सुनावणीदरम्यान अनुभवलेल्या कोर्टरूममधील विनोदी घटना, संवाद पोस्ट केल्या जातील. कोर्टरूम हे विनोदाचे सुपीक स्रोत असल्याचे हायकोर्टाने म्हटले आहे. यासाठी विशेष ई मेल आयडी तयार केला आहे. वकील, याचिकाकर्ते, साक्षीदार कोर्टरूममध्ये घडलेल्या मजेदार घटना आणि विनोदी देवाण-घेवाण यावर पाठवू शकतात. ई- मेल आयडीवर मिळालेल्या पोस्ट नियुक्त समितीद्वारे तपासल्यानंतर संकेतस्थळावर प्रकाशित केल्या जातील.
वेबसाइटवरील विभाग अद्याप पूर्णपणे कार्यान्वित व्हायचा आहे, तथापि त्यात आतापर्यंत पाच विनोद प्रसिद्ध केले आहेत. यापैकी एक स्वतः न्यायाधीशांनीच लिहिला आहे.
वरिष्ठ वकील ‘क्ष’ : न्यायमूर्ती महोदयांनी कृपा करून आता पेपर बुकच्या पान ६ वर यावे आणि डाव्या स्तंभावरील तारा (स्टार) पाहावा.
न्यायमूर्ती - मिस्टर क्ष, मला तारे फक्त संध्याकाळी ७ नंतर आकाशात दिसतात. तुम्ही ज्याचा संदर्भ देत आहात तो ‘ताऱ्याचे चिन्ह’ आहे.
(६ सप्टेंबर रोजी न्या. राजीव शकधर यांनी शेअर केलेली पोस्ट.)
नियमित गोंधळादरम्यान, विनोद अनपेक्षितपणे वाढतो. कधी वकील किंवा न्यायाधीशाच्या बुद्धीमुळे तर कधी वादी, प्रतिवादी किंवा साक्षीदाराच्या टिप्पणीमुळे विनोद घडतात. ‘ह्युमर इन कोर्ट’ हा दिल्ली कोर्टाच्या माहिती तंत्रज्ञान आणि आर्टिफिशियल इंटेलिजेंस कमिटीचा प्रकल्प आहे. गंभीर सुनावणीतील विनोदी क्षणांचे भावी पिढीसाठी जतन करण्याचा उद्देश यामागे आहे. (दिल्ली हायकोर्ट पोर्टल)