ऑनलाइन लोकमत
मुंबई - विजय माल्ल्याच्या गोव्यात असलेल्या अलिशान किंगफिशर व्हिलासाठी बँकांना खरेदीदार सापडेनासा झाला आहे. या व्हिलाच्या विक्रीसाठी बुधावारी आयोजित करण्यात आलेल्या लिलावामध्ये बोली लावण्यासाठी कुणीही पुढे आले नाहीत. त्यामुळे माल्ल्यांनी थकवलेले कर्ज वसूल करण्यासाठी धडपडत असलेल्या बँकांना धक्का बसला आहे.
विजय माल्ल्यांनी थकवलेल्या कर्जाची वसूली करण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या नेतृत्वाखाली 17 बँकांनी या लिलावाचे आयोजन केले होते. मात्र आधारभूत किंमत अधिक असल्याने खरेदीदार पुढे आले नसल्याचे सूत्रांनी म्हटले आहे.
गोव्यातील समुद्र किनारी सुमारे 12 हजार 359 चौरस मीटर एवढ्या विस्तिर्ण आवारात पसरलेल्या किंगफिशर व्हिलासाठी 85.3 कोटी रुपये एवढी आधराभूत किंमत ठेवण्यात आली होती. सप्टेंबर महिन्यात तसेच या महिन्याच्या सुरुवातीला सुमारे अर्धा डझन व्यक्तींनी हा व्हिला खरेदी करण्यासाठी उत्सुकता दर्शवली होती. मात्र आज झालेल्या लिलावात एकही खरेदीदार पुढे आला नाही.