नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुसºया कारकीर्दीत पायाभूत विकासावर भर दिला जाण्याची शक्यता लक्षात घेऊन भारतीय विमानतळ प्राधिकरणाने (एआयआय) राज्य सरकारांना विशेष पत्र पाठवून छोट्या शहरांतही दुसºया विमानतळांसाठी जागा पाहून ठेवण्यास सांगितले आहे. विमानतळांच्या संभाव्य जागांच्या आजूबाजूला बांधकामे मर्यादित उंचीची राहतील, याची खबरदारी घेण्याची विनंतीही राज्य सरकारांना करण्यात आली आहे. येणाऱ्या काळात देशातील विमानतळांची संख्या वाढेल, असा अंदाज एआयआयच्या विनंतीवरून बांधला जात आहे.
एआयआयचे चेअरमन गुरुप्रसाद मोहापात्रा यांनी सांगितले की, केवळ मोठ्या मेट्रो शहरांतच नव्हे, तर तुलनेने छोट्या असलेल्या शहरांतही दुसऱ्या विमानतळांची गरज निर्माण झालेली आहे. दिल्ली, मुंबई आणि गोवा यासारख्या ठिकाणी कामे सुरू झालेली आहेत. इतर ठिकाणीही ती लवकर सुरू व्हायला हवीत. त्यामुळेच राज्य सरकारांना दुसºया विमानतळांसाठी जागा शोधून ठेवण्याची, तसेच संबंधित परिसरात इमारतींच्या उंचीवर बंधने घालण्याची विनंती करण्यात आली आहे. अशा शहरांत नंतर जेव्हा विमानतळांची कामे सुरू होतील, तेव्हा त्यात कोणत्याही प्रकारचे अडथळे राहणार नाहीत.पुण्याचा समावेशदुसऱ्या विमानतळांची गरज असलेल्या शहरांची संख्या देशात खूप मोठी आहे. विशाखापट्टणम, जयपूर, पुणे, अहमदाबाद, राजकोट, पाटणा, कोलकाता, चेन्नई आणि बंगळुरू या शहरांचा त्यात समावेश आहे. देशातील बहुतांश विमानतळांवरील टर्मिनल आपल्या क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी हाताळीत आहेत. पाटणा आणि गुवाहाटी यासारख्या ठिकाणच्या विमानतळांवर खूप गर्दी वाढली आहे. दिल्ली, मुंबई आणि बंगळुरू येथील विमानतळांवर जेट एअरवेजमधील संकट निर्माण होण्यापूर्वी मुक्त स्लॉटच उपलब्ध नव्हते.