चंदिगड : पंजाबमध्ये (Punjab) काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू (Navjot Singh Sidhu) यांचे सल्लागार मोहम्मद मुस्तफा (Mohammad Mustafa) यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. यामुळे पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी नवज्योत सिंग सिद्धू अडचणीत येण्याची शक्यता आहे. मुस्तफा यांच्यावर धार्मिक भावना भडकावल्याचा आरोप होता.
मोहम्मद मुस्तफा यांच्या भाषणाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भाजपा (BJP) आणि आम आदमी पार्टीकडून (AAP) त्यांच्यावर सतत हल्लाबोल केला जात होता. मोहम्मद मुस्तफा यांनी आपल्या भाषणात अल्लाहची शपथ घेऊन वादग्रस्त वक्तव्ये केली आहेत. भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते इल्मी यांनी आरोप केला आहे की, मोहम्मद मुस्तफा यांनी आपल्या वक्तव्यात 'हिंदू' शब्द वापरला आहे. दरम्यान, मोहम्मद मुस्तफा यांची पत्नी रजिया सुलताना या मालेरकोटला विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवार आहेत. मालेरकोटला हा पंजाबमधील मुस्लिम बहुल जिल्हा आहे.
भाजपाने पत्रकार परिषदेत व्हिडिओ क्लिप दाखवली. ज्यामध्ये मोहम्मद मुस्तफा यांनी 20 जानेवारी रोजी मालेरकोटला येथील जाहीर सभेत भाषण केल्याचे समजते. या व्हिडिओमध्ये "मी अल्लाहची शपथ घेतो की मी त्यांना कोणताही कार्यक्रम करू देणार नाही. मी एक 'कौमी फौजी' आहे... मी RSS एजंट नाही, जो घाबरून घरात लपून बसेन", असे म्हटले आहे. तसेच, या व्हिडिओमध्ये कथितरित्या म्हटले आहे की, 'जर त्यांनी पुन्हा असे करण्याचा प्रयत्न केला, तर मी अल्लाहची शपथ घेतो की, मी त्यांना त्यांच्या घरात मारहाण करेन.'
मुस्तफा यांनी स्पष्टीकरणात काय म्हटले?दुसरीकडे, मोहम्मद मुस्तफा यांनी 'हिंदू' शब्द वापरल्याचा इन्कार केला आहे. काही जणांनी माझा पाठलाग करून माझ्यासोबत गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केल्यामुळे मी आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनाच लक्ष्य केले होते, असे मोहम्मद मुस्तफा यांनी म्हटले आहे. दरम्यान, देशाचे जबाबदार पद भूषवलेली व्यक्ती जेव्हा असे प्रकार करते, तेव्हा त्यांच्यावर प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक होते. मोहम्मद मुस्तफा कोणी सामान्य माणूस नाही. पोलीस खात्यात ते वरिष्ठ अधिकारी राहिले आहेत.